ठाण्यात इलेक्ट्रिक डक्टला आग
दोघे जखमी, ७० जणांची सुखरूप सुटका
ठाणे, ता. ३ (बातमीदार) : मंगळवारी पहाटे ४ ते ४.१५ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या शास्त्री नगर येथील मिलन हिल या इमारतीच्या १० व्या मजल्यावरील इलेक्ट्रिक डक्टमध्ये आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या धुराच्या लोटाने त्या इमारतीमध्ये अडकलेल्या ६० ते ७० जणांची सुटका करण्यात यश आले आहे. या घटनेत रुचिरा देशमुख (वय ७४) आणि विवेक प्रधान (वय ६२) या दोघांना दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.
ठाण्याच्या शास्त्रीनगर नाक्यावर १८ मजली असलेल्या मीनल हिल या इमारतीमधून मंगळवारी पहाटे धुराचे लोट येत असल्याचे स्थानिक नागरिक चंदन पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ती माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. या घटनेचा गांभीर्य लक्षात घेत आपत्ती व्यवस्थापन कक्षेचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीने इमारतीत अडकलेल्या ६० ते ७० जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. या सुटकेदरम्यान ११ व्या मजल्यावरील रुचिरा देशमुख व १५ व्या मजल्यावरील विवेक प्रधान यांना दुखापत झाल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही आग दहाव्या मजल्यावरील डक्टला लागली होती, पण पाहता पाहता ती १३ व्या मजल्यापर्यंत पसरली. तब्बल सव्वा ते दीड तासांनी या आगीवर अग्निशमन दलाला पूर्णपणे नियंत्रण मिळवता आले. या वेळी एक अग्निशमन दलाचे व एक बचाव पथकाचे वाहन पाचारण करण्यात आले होते. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.