मालमत्ता थकबाकीदारांचे पाणी होणार खंडित
अनिवासी मालमत्ता होणार जप्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. अशातच पालिकेच्या मालमत्ता विभागाला दिलेले मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आल्याचे दिसून आले. अशातच मागील एक ते दोन महिन्यांपासून मालमत्ता करवसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने पालिका आयुक्त सौरभ राव यांनी नाराजी व्यक्त केली असून जे कर भरत नाहीत, अशा निवासी मालमत्ताधारकांचे नळसंयोजन खंडित करणे, कर न भरणाऱ्या अनिवासी मालमत्ता जप्ती करण्याच्या सूचना राव यांनी बैठकीत दिल्या आहेत.
ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती अजूनही स्थिर झालेली नाही. अशातच पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कामामुळे पालिकेच्या कर वसुलीवरदेखील परिणाम झाला आहे. त्यामुळे मालमत्ता कर, पाणीपट्टी कर वसुलीवर अपेक्षेपेक्षा कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यात २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मालमत्ता करवसुलीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त मिताली संचेती तसेच सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते. मागील एक ते दोन महिन्यांपासून मालमत्ता कराची वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने आयुक्तांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ज्या करदात्यांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांच्यावर तत्काळ जप्ती, वॉरंट बजावणे, नळ संयोजन खंडित करून, पाणीपुरवठा बंद करणे नळजोडणी व इतर सेवा खंडित करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. अनिवासी मालमत्तांबाबत विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून १० फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेत अनिवासी मालमत्ताधारकांवर जप्ती व सील करण्याची कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्त व परिमंडळ उपायुक्तांना दिले आहेत. तसेच, करवसुली वाढविण्यासाठी विविध ठिकाणी मोठ्या गृहसंकुलांमध्ये विशेष शिबिर आयोजित करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
दरम्यान, ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी संभाव्य अप्रिय कारवाई टाळण्यासाठी तत्काळ महापालिकेकडे मालमत्ता कर जमा करावा, असे आवाहन करण्यात आले. २०२५-२६ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके ऑनलाइन पद्धतीने भरण्याकरिता महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फेब्रुवारी व मार्च २०२६ या कालावधीमधील सर्व शनिवार, रविवार तसेच सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (३ मार्च २०२६ला धूलिवंदन असल्याने हा दिवस वगळून) सकाळी १०.३० ते ४.३० तसेच सर्व रविवार सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत कर संकलनाकरिता करवसुली संकलन केंद्र व मुख्य कार्यालयही कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.