जांभूळ येथे पुरातन श्री गणपती मंदिराचा जीर्णोद्धार
३५ वर्षांनंतर मंदिराला नवीन रूप; विविध धार्मिक कार्यक्रम
टिटवाळा, ता. ५ (वार्ताहर) : कल्याण तालुक्यातील जांभूळ गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जात आहे. आपल्या विकासकामांनी गावाला राज्यपातळीवर ओळख मिळवून देणारे सरपंच परिक्षित हिराजी पिसाळ यांच्या संकल्पनेतून आणि संपूर्ण पिसाळ कुटुंबीयांच्या पुढाकाराने, येथील पुरातन श्री गणपती मंदिराचा तब्बल ३५ वर्षांनंतर भव्य जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या मंगलमयी सोहळ्यानिमित्त येत्या शुक्रवारी (ता. ६) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१९९१ मध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी एका क्रेशरमध्ये गणेशमूर्तीचा अर्धा भाग अचानक सापडला होता. हिराजी पिसाळ यांनी ही मूर्ती पाहिल्यानंतर, शहाड येथील आध्यात्मिक गुरु चिंतामणी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णाकृती गणेशमूर्ती घडवण्यात आली. माघी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती, जे आज परिसरातील भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे.
सुभाष यशवंतराव पिसाळ आणि सुनीता सुभाषराव पिसाळ यांच्या स्मृतींना वंदन करत हिराजी पिसाळ, नम्रता पिसाळ, दिगंबर पिसाळ, भगवान पिसाळ, जतिन पिसाळ आणि सरपंच परिक्षित पिसाळ यांनी एकत्र येत मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प केला होता. वर्षभराच्या अथक परिश्रमानंतर अंबरनाथ–जांभूळ रस्त्यालगत अत्यंत देखणे, आकर्षक आणि प्रशस्त मंदिर साकारले आहे. सोहळा जांभूळ गावासाठी ऐतिहासिक असून, गणरायाच्या आशीर्वादाने मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. परिसरातील सर्व गणेशभक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जांभूळचे सरपंच परिक्षित हिराजी पिसाळ यांनी केले आहे.
असा असेल कार्यक्रम
शुक्रवारी सकाळी भावपूर्ण हरिपाठ आणि जांभूळ-बदलापूर पंचक्रोशीतील श्री संतसेवा हरिपाठ मंडळाचे सादरीकरण होईल. त्यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार व इतिहास वर्णक ह.भ.प. इंद्रजित महाराज रसाळ (बीड) यांचे विशेष कीर्तन होणार आहे. रात्री साडेसातपासून महाप्रसाद (भंडारा) होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.