घोडबंदरवर धोकादायक वाहतूक
गॅस टँकरमधील घातक रसायनांमुळे अपघाताची भीती
ठाणे शहर, ता. ५ (बातमीदार) : मुंबई-पुणे महामार्गावर अलीकडेच गॅस टँकर उलटल्याने झालेली कोंडी आणि निर्माण झालेला धोका अद्याप ताजा असतानाच, ठाण्यातील घोडबंदर मार्गावरही तशीच जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरी वसाहतीने वेढलेल्या या मार्गावरून दररोज हजारो ज्वलनशील आणि घातक रसायनांची वाहतूक होत असून, एखादा मोठा अपघात घडल्यास त्याचा सामना करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
उरणच्या न्हावा-शेवा बंदरातून गुजरात आणि पालघरकडे जाणारी अवजड वाहतूक घोडबंदर मार्गावरून होते. सध्या येथे मेट्रो आणि रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, एमएमआरडीए नियोजन पूर्णपणे फसल्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. मेट्रो स्थानकांच्या पायऱ्यांची चुकीची जागा आणि उड्डाणपुलाच्या चढणीवर धोकादायक पद्धतीने उभारलेले दुभाजक अपघातांना निमंत्रण देत आहेत. याच तांत्रिक चुकांमुळे अवजड वाहने उलटण्याचे प्रमाण वाढले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये अवघ्या तीन दिवसांत चार केमिकल टँकर उलटल्याची गंभीर घटना येथे घडली होती.
यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव
दुर्दैवाने एखादा गॅस टँकर नागरी वसाहतीत उलटला, तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि आरटीओ यांच्यात तातडीने समन्वय साधणारी यंत्रणा उपलब्ध नाही. अपघातस्थळी सर्वात आधी पोहोचणाऱ्या वाहतूक पोलिसांनाही अशा धोकादायक टँकर हाताळण्याचे कोणतेही विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले नाही.
नियम धाब्यावर
धोकादायक रसायने वाहून नेणाऱ्या टँकरचालकांकडे विशेष परवाना आणि प्रशिक्षण असणे अनिवार्य आहे. मात्र, प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांकडून या नियमांची कोणतीही तपासणी होत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, अशा चालकांना प्रशिक्षण देणारी कोणतीही व्यवस्था ठाण्यात उपलब्ध नाही.
धोकादायक पदार्थांची वाहतूक
या मार्गावरून दररोज स्फोटके आणि गॅस, ज्वलनशील द्रव व घन पदार्थ, विषारी आणि किरणोत्सर्गी पदार्थ, दाहक रसायनांची वाहतूक होते. भिवंडी, डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरात या रसायनांचे मोठे साठे असून, त्यांचे नियमित ऑडिट होणे गरजेचे आहे. घोडबंदरचा हा मार्ग सध्या नागरिकांसाठी ‘डेथ ट्रॅप’ ठरत असून, प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.
धोकादायक आणि ज्वालाग्रही पदार्थांची वाहतूक करणाऱ्या चालकाला पाच वर्षांच्या अवजड वाहन चालवण्याच्या परवान्यासह अशा वस्तूंची वाहतूक करण्याचे वेगळे प्रशिक्षण दिले जाते, परंतु अनेक जण धोकादायक वस्तूंच्या वाहतुकीत प्रशिक्षित नसलेल्या चालकांकडून अशी वाहतूक करून घेतात. तसेच अशा अपघाताचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोटार वाहन अपघातांच्या कायाद्याची सखोल माहिती असणे आवश्यक आहे; मात्र पोलिस असे प्रशिक्षण देण्याची तसदी घेत नाहीत.
- प्रदीप घैसास, धोकादायक रसायन अभ्यासक, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.