पालिकेकडून स्वच्छता मोहीम
हायवा-जेसीबी-टिपर व स्वच्छतादूतांच्या सहभागातून सघन घनकचरा व्यवस्थापन
पनवेल, ता. ५ (बातमीदार)ः पनवेल शहरात स्वच्छ, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने पनवेल महापालिकेने ‘सघन घनकचरा व्यवस्थापन व विशेष स्वच्छता मोहीम’ युद्धपातळीवर राबविली. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ही मोहीम जानेवारी २०२६ च्या अखेरच्या आठवड्यात शहरातील विविध प्रभागांत एकाचवेळी राबविण्यात आली. यांत्रिक साधने, हायवा, जेसीबी, टिपर वाहने आणि मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ यांच्या समन्वयातून व्यापक स्वच्छता ‘ड्राइव्ह’ घेण्यात आला.
या मोहिमेत वडाळे तलाव, कोळीवाडा, खांदा कॉलनी, कामोठे, खारघर आणि कळंबोली या परिसरांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला. हायवा वाहनांद्वारे साचलेला घनकचरा व राडारोडा उचलण्यात आला, तर जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यालगतची माती, नाल्यांतील गाळ आणि बांधकामजन्य कचऱ्याची सखोल साफसफाई करण्यात आली. टिपर वाहनांमुळे घरगुती व परिसरातील कचऱ्याचे नियमित संकलन आणि वाहतूक सुरळीतपणे पार पडली. विशेष म्हणजे, या मोहिमेदरम्यान दररोज १०८ ते ११९ स्वच्छताकर्मी प्रत्यक्ष मैदानात कार्यरत होते; वडाळे तलाव परिसरात सर्वाधिक मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.
या समन्वित कारवाईमुळे रस्त्यांवरील धूळ व कचऱ्यात लक्षणीय घट झाली असून, मोकळ्या जागा आणि नाल्यांची प्रभावी स्वच्छता साध्य झाली आहे. वडाळे तलावातून मोठ्या प्रमाणावर जलपर्णी काढून टाकल्याने जलाशयाच्या स्वच्छतेतही सुधारणा झाली आहे. नागरिकांच्या आरोग्यास पोषक, दुर्गंधीमुक्त वातावरण निर्माण होण्यास या मोहिमेचा थेट फायदा झाला असून, स्वच्छ पनवेलच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
घनकचरा आणि राडारोडा उचलण्यासाठी ‘हायवा’ वाहनांचा प्रभावी वापर करण्यात आला. नुकत्याच झालेल्या या मोहिमेमध्ये वडाळे तलाव, कोळीवाडा, कामोठे सेक्टर-२१ आणि खांदा कॉलनी या भागांतून मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा हटवून परिसर मोकळा करण्यात आला. रस्त्यालगत साचलेली माती, नाल्यांतील गाळ आणि बांधकामजन्य कचरा हटवण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर दोन सत्रांत करण्यात आला. घरगुती आणि परिसरातील कचरा उचलण्यासाठी टिपर वाहनांची पूर्णवेळ सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे दररोज १०८ ते ११९ स्वच्छताकर्मी प्रत्यक्ष मैदानात उतरले होते.
संकलित कचऱ्याचा तपशील
कचरा व राडारोडा : सुमारे ८० टन मिश्र कचरा व राडारोडा संकलित.
धूळ व माती : रस्त्यांच्या कडेला साचलेली २१ टन धूळ जेसीबी व मनुष्यबळाद्वारे काढली.
जलपर्णी : वडाळे तलाव परिसरातून १५ टन जलपर्णी काढून तलावाची स्वच्छता केली.
कोट
आधुनिक यंत्रसामग्री, नियोजनबद्ध मनुष्यबळ आणि नियमित देखरेख या त्रिसूत्रीवर महापालिका भर देत आहे. पनवेलला कचरामुक्त करण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारच्या सघन स्वच्छता मोहिमा सातत्याने राबविल्या जातील.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.