कर्जतमध्ये भाजप-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद
बिरदोळे गावात भाजपचे बाहेरील कार्यकर्ते आल्याने सेना नेते अमर मिसाळ यांची नाराजी
कर्जत, ता. ७ (बातमीदार) ः तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शनिवारी (ता. ७) मतदान पार पडले. यापूर्वी माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद वॉर्डातील बिरदोळे गावात भाजप व शिंदे गट कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. पहाटे सुमारे ३ वाजता ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. घटनेनंतर दोन्ही गटांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र, दोन्ही गटांपैकी पोलिसांत कोणीही परस्परविरोधी तक्रार दाखल न केल्याने सामंजस्याने वाद मिटवण्यात आला.
माणगावतर्फे वरेडी गटातून भाजपकडून किरण ठाकरे यांच्या भावाच्या पत्नी राधिका ठाकरे निवडणूक लढवत आहेत, तर शिंदे गटाकडून माजी सभापती अमर मिसाळ यांच्या भावाच्या पत्नी रेश्मा मिसाळ या उमेदवार आहेत. पहाटे तीन वाजता बिरदोळे गावात भाजप व शिंदे गट कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.
याची माहिती मिळताच अमर मिसाळ आणि किरण ठाकरे यांनी हस्तक्षेप करून समजुतीने वाद मिटवला.
दरम्यान, तालुक्यात एकूण भाजप-शिंदे गट युती असली तरी माणगाव वॉर्डमध्ये भाजपची मैत्रीपूर्ण लढत असल्याने भाजप व शिंदे गट यांच्यात रस्सीखेच दिसून येत आहे. घटनेनंतर सकाळी साडेसात वाजता मतदान सुरळीतपणे सुरू झाले असून, परिसरात शांतता आहे. प्रशासनाकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले आहे.
भाजपच्या भूमिकेबाबत नाराजी
शिंदे गटाचे अमर मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. आचारसंहिता लागू असताना, विशेषतः मतदानाच्या आदल्या दिवशी कोणताही प्रचार किंवा बाहेरगावचे कार्यकर्ते दुसऱ्या गावात येणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी निषेध नोंदवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.