जव्हार तालुक्याची क्रिकेटमध्ये सरशी
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी
जव्हार, ता. ७ (बातमीदार) : पालघर जिल्हा परिषदेमार्फत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये जव्हार तालुक्याने विविध क्रीडा प्रकारांत दमदार कामगिरी करत जिल्हा स्तरावर आपला ठसा उमटवला. विशेषतः क्रिकेटच्या अंतिम सामन्यात विक्रमगड तालुक्यावर मात करत जव्हार संघाने विजेतेपद पटकावले.
दरम्यान, ३१ जानेवारीपासून सलग तीन दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद मुख्यालयासह पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. क्रिकेट, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, रिले, धावण्याची स्पर्धा, कॅरम, संगीत खुर्ची, गोळाफेक, थाळीफेक, रांगोळी अशा विविध खेळांचा या स्पर्धेत समावेश होता. क्रिकेटच्या अंतिम सामन्यात जव्हार व विक्रमगड तालुक्यांचे संघ आमनेसामने होते. चुरशीच्या लढतीत संयमी फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि सांघिक खेळाच्या बळावर जव्हार संघाने विजय मिळवत चषकावर आपले नाव कोरले. या यशामागे गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते, सहाय्यक गटविकास अधिकारी संदेश दुमाडा, परीक्षाधीन गटविकास अधिकारी अमित भोये, सहाय्यक प्रशासन अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी संजय शेळकंदे, प्रवीण चौधरी यांच्यासह सर्व विभागप्रमुखांचे योगदान मोलाचे ठरले.
स्पर्धांचे बक्षीस वितरण जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीकमसलत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर यांच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी मनोज रानडे यांनी शिस्तबद्ध व आनंदी वातावरणात स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. विजेत्या संघ व खेळाडूंना स्मृतिचिन्हे, प्रमाणपत्रे व पदके देण्यात आली.
-----------
चौकट
इतर स्पर्धांतही ठसा
तालुका स्तरावरच केलेले काटेकोर नियोजन, योग्य खेळाडूंची निवड आणि नियमित सराव हे जव्हारच्या यशाचे प्रमुख कारण ठरले. क्रिकेटसह खो-खो, कबड्डी, रिले तसेच पुरुष व महिलांच्या धावण्याच्या स्पर्धेत जव्हारच्या संघांनी उल्लेखनीय कामगिरी केली आपला ठसा उमटवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.