मांज्यात अडकले कावळ्याचे पंख
नागरिकांच्या तत्परतेमुळे कावळ्याला जीवदान
कल्याण, ता.८ (बातमीदार) : पतंगाच्या घातक मांज्यात अडकून झाडावर असहाय्य अवस्थेत लटकणाऱ्या एका कावळ्याला स्थानिक संवेदनशील नागरिकांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. माणुसकी अजूनही जिवंत आहे याची प्रचिती देणारी ही घटना चिकणघर परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पतंगबाजीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे, मात्र यासाठी वापरला जाणारा नायलॉन किंवा काचयुक्त मांजा मुक्या पक्ष्यांच्या जीवाशी खेळ ठरत आहे. असाच एक मांजा झाडाच्या फांदीत अडकला होता, ज्यात एका कावळ्याचे पंख पूर्णपणे गुंतले होते. तो कावळा स्वतःची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात जखमी होत होता आणि असहाय्यपणे झाडावर लटकत होता. कावळ्याची ही अवस्था पाहून परिसरातील नागरिक विकास केणे, चेतन केणे, प्रमोद कुलकर्णी, सुधीर केणे आणि हिमांशू केणे यांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी पुढाकार घेतला. झाडाची उंची आणि मांज्याचा गुंता यामुळे ही बचाव मोहीम आव्हानात्मक होती. मात्र, अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे या तरुणांनी कावळ्यापर्यंत पोहोचून त्याची मांज्यातून सुटका केली. सुरक्षित सुटका झाल्यानंतर काही वेळाने त्या पक्षाने पाणी पिऊन पुन्हा आकाशात झेप घेतली, तेव्हा उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत होते.
या बचाव कार्यात सहभागी असलेल्या तरुणांनी आवाहन केले आहे की, पतंग उडवताना पक्ष्यांच्या जीवाचा विचार करावा आणि घातक मांज्याचा वापर टाळावा. केवळ मनोरंजनासाठी एखाद्या मुक्या जीवाचा बळी जाऊ नये, ही भावना त्यांनी व्यक्त केली. पक्षी हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. त्याला संकटात पाहून आम्ही आमचे कर्तव्य बजावले असल्याच्या भावना यावेळी बचावकर्त्यांनी व्यक्त केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.