डोंबिवलीत प्रथमच १२ तास स्टेडियम रन
४०० हून अधिक धावपटूंचा सहभाग; अनोख्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
(सकाळ वृत्तसेवा)
डोंबिवली, ता. ८ : डोंबिवलीच्या क्रीडा क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकत रनर्स क्लॅन फाउंडेशन, डोंबिवली यांच्या वतीने प्रथमच १२ तास स्टेडियम रन या अनोख्या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. शुक्रवारी फेब्रुवारी रोजी मिलापनगर, डोंबिवली पूर्व येथील डॉ. प्रभाकर राव मैदानावरील सिंथेटिक ट्रॅकवर ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या स्पर्धेचा शुभारंभ कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या वेळी क्रीडाप्रेमी, नागरिक आणि धावपटूंनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या अनोख्या उपक्रमाला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला असून, ४०० हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेत १०० हून अधिक धावपटूंनी सलग १२ तास धावण्याची किमया साधली, तर १५० पेक्षा अधिक धावपटूंनी सहा तास सोलो रनमध्ये सहभाग घेतला. याशिवाय दोन तासांच्या रिले रनमध्ये १५० हून अधिक स्पर्धकांनी धाव घेतली. या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले ते १५ महिलांचे नऊवारी साडीतील धावणे. अस्सल मराठी वेशभूषेत धावून त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि स्त्रीशक्तीचे दर्शन घडवले.
संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील ही एकमेव १२ तास स्टेडियम रन स्पर्धा असून, रनर्स क्लॅन फाउंडेशनने अत्यंत नियोजनबद्ध व जबाबदारीने ती यशस्वी करून दाखवली.
चौकट
डोंबिवलीला अल्ट्रा रनिंगचे नवे केंद्र
“एक दौड वीर जवानों के लिए” या संकल्पनेखाली गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली अशी ६५ किमी अर्बन अल्ट्रा मॅरेथॉन सलग पाच वर्षे यशस्वीपणे आयोजित केल्यानंतर, रनर्स क्लॅन फाऊंडेशनने १२ तास स्टेडियम रनच्या माध्यमातून डोंबिवलीला अल्ट्रा रनिंगच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून दिले आहे. या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांना दीर्घ पल्ल्याच्या धावण्याची प्रेरणा मिळत असून, डोंबिवलीचा क्रीडा शहर म्हणून होणारा विकास अधिक वेग घेणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.