काळू नदी जलपर्णीच्या विळख्यात
नैसर्गिक प्रवाह मंदावला; टिटवाळ्यात भीषण पर्यावरणीय संकट
टिटवाळा, ता. ९ (वार्ताहर) : वासुंदरी आणि मांडा गावांच्या सीमेवरून वाहणारी काळू नदी सध्या जलपर्णीच्या विळख्यात सापडली आहे. नदीच्या विस्तीर्ण पात्रावर हिरवी चादर पसरल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह जवळपास थांबला असून, यामुळे पर्यावरणीय समतोल ढासळण्याची आणि आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
महाकालेश्वर मंदिराजवळून वाहणाऱ्या या नदीत सांडपाणी आणि प्लॅस्टिक कचरा मिसळल्याने जलपर्णीची झपाट्याने वाढ झाली आहे. याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजन घटल्याने मासे व इतर जलचर मृत्युमुखी पडण्याची शक्यता आहे. पाणी साचून राहिल्याने डासांची उत्पत्ती वाढली असून परिसरात मलेरिया व डेंगीचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी जलपर्णी न काढल्यास पाण्याचा निचरा होणार नाही, ज्यामुळे पावसाचे पाणी शेतात आणि वस्तीत शिरून पूरस्थिती उद्भवू शकते. या गंभीर विषयावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (कल्याण) प्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केले, की प्रवाह मंदावणे आणि कडाक्याचे ऊन यामुळे जलपर्णी वाढते. ही जलपर्णी काढण्याची जबाबदारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची आहे. आम्ही याबाबत महापालिकेला तातडीने पत्र पाठवून कार्यवाही करण्यास सांगणार आहोत.
पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या ‘अंघोळीची गोळी’ संस्थेचे अविनाश पाटील यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह संथ होतो आणि पुराचा धोका वाढतो. केवळ जलपर्णी काढून चालणार नाही, तर नदीत मिसळणारे सांडपाणी रोखणे हाच कायमस्वरूपी उपाय आहे, असे त्यांनी नमूद केले.
ग्रामस्थांची मागणी
प्रशासनाने तातडीने जलपर्णी निर्मूलन मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी मांडा आणि वासुंदरी येथील ग्रामस्थांनी केली आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास हे प्रदूषण संपूर्ण परिसरासाठी मोठे संकट ठरेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
जलचरांचा मृत्यू
जलपर्णीमुळे सूर्यप्रकाश तळापर्यंत पोहोचत नाही, ज्यामुळे पाण्याचे तापमान वाढून त्यातील विरघळलेला ऑक्सिजन (Dissolved Oxygen) वेगाने घटत आहे. यामुळे मासे व इतर जलचर मृत पावत असून नदीची जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
साथीच्या आजारांचा धोका
पाणी साचून राहिल्याने हा परिसर डासांचे प्रजनन केंद्र बनला आहे. वासुंदरी, मांडा आणि टिटवाळा परिसरात मलेरिया, डेंगी आणि चिकुनगुनियासारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाळ्याला आता काहीच महिने शिल्लक असताना, जर ही जलपर्णी काढली नाही, तर पावसाच्या पाण्याचा निचरा होणार नाही. नदीचे पात्र बुजल्यासारखे झाल्याने हे पाणी थेट शेतात आणि लगतच्या मानवी वस्त्यांमध्ये शिरून मोठी वित्तहानी व जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.