जलवाहिनी फुटल्याने पाण्याचे कारंजे
खंबाळपाड्यात हजारो लिटर पाणी वाया; रस्ते जलमय
कल्याण, ता. ११ (बातमीदार) : डोंबिवली शहराजवळील ठाकुर्ली, खंबाळपाडा परिसरात मंगळवारी (ता. १०) रात्री मुख्य जलवाहिनीला भगदाड पडल्याची खळबळजनक घटना घडली. अचानक जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून गेले, ज्यामुळे परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास खंबाळपाडा येथील मुख्य जलवाहिनी अचानक फुटली. पाण्याचा दाब इतका प्रचंड होता की, रस्त्यावर पाण्याचे उंच कारंजे उडत होते. काही वेळातच संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागली. साचलेल्या पाण्यामुळे दुचाकी घसरल्याच्या काही घटनाही घडल्या, त्यामुळे चालकांना पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागली.
जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुख्य पुरवठा बंद करून गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, या मोठ्या गळतीमुळे आणि त्यानंतर सुरू झालेल्या दुरुस्ती कामामुळे ठाकुर्ली आणि आसपासच्या परिसरातील पाणीपुरवठ्यावर बुधवारी परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. गळती थांबवण्यासाठी जुना पाइप बदलण्याचे किंवा दुरुस्त करण्याचे काम सुरू असून, लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन संबंधित विभागाने दिले आहे. वारंवार जलवाहिन्या फुटण्याच्या घटनांमुळे पाण्याचा अपव्यय होत असून, प्रशासनाने जुन्या झालेल्या जलवाहिन्यांच्या देखभालीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.