रोगापेक्षा ठरतोय इलाज भयंकर!
मुंबई उपनगरी मार्गांवरील प्लॅटफॉर्म रचनेत बदल; तज्ज्ञ, प्रवासी संघटनांची तीव्र टीका
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबई उपनगरी रेल्वे ही शहराची जीवनवाहिनी मानली जात असली तरी प्रवासी सुरक्षेच्या नावाखाली राबविण्यात येणाऱ्या काही उपाययोजनांवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्लॅटफॉर्मचा शेवटचा भाग रचनेत बदल, लोखंडी बॉक्सची उभारणी, रुळांमधील बॅरिकेट्सवर ग्रीस-ऑईल लावण्यासारखे प्रयोग प्रत्यक्षात प्रवाशांसाठी अधिक धोकादायक ठरत असल्याची टीका प्रवासी संघटना व तज्ज्ञांकडून केली जात आहे.
रेल्वे अभियांत्रिकी मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्लॅटफॉर्मचा शेवटचा भाग (प्लॅटफॉर्म एंड) साधारणपणे उतारयुक्त ठेवण्याची पद्धत आहे. यामागे डब्याच्या बाह्य विस्तारासाठी आवश्यक मोकळीक, संरचनात्मक सुरक्षितता, डब्यांची स्थानांतरण हालचाल तसेच आपत्कालीन परिस्थितीत उतरण्याची सोय अशी तांत्रिक कारणे दिली जातात. रेल्वे परिमाण मानकानुसार आवश्यक सुरक्षित अंतर राखणे बंधनकारक असते. त्यामुळे पारंपरिक प्लॅटफॉर्मचा शेवटचा भाग उतारात सोडला जातो.
मात्र मुंबई उपनगरी मार्गांवर गर्दीचा विचार करून अनेक ठिकाणी हा उतार काढून टाकत शेवटचा भाग समतल किंवा उभा करण्यात आला आहे. त्यासोबतच प्रवासी रूळ ओलांडू नयेत, यासाठी प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टोकाला लोखंडी बॉक्स बसविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात आपत्कालीन परिस्थितीत हेच बॉक्स अडथळा ठरत असून, हालचाली अधिक धोकादायक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
सुरक्षा की संकट?
धक्कादायक बाब म्हणजे अशा उड्या रोखण्यासाठी काही ठिकाणी बॅरिकेट्सवर ग्रीस व काळे ऑईल लावण्यात आल्याचेही समोर आले आहे. प्रवासी चढू नयेत हा हेतू असला तरी हा तात्पुरता उपाय असल्याची टीका होत आहे. त्यामुळे देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अडचणी येत आहेत. पादचारी पूल, एस्केलेटर, लिफ्ट व प्लॅटफॉर्म कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर भर देण्याऐवजी भौतिक अडथळे उभारून जबाबदारी झटकली जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
जबाबदारी झटकली?
रेल्वे प्रशासन मात्र या उपाययोजना अपघात प्रतिबंधासाठी आवश्यक असल्याचे सांगते. अनधिकृत रूळ ओलांडणे रोखण्यासाठी भौतिक प्रतिबंधक उभारणे ही नियमित सुरक्षा पद्धत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात चार वर्षांपूर्वीच नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्याचेही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. तथापि, तज्ज्ञांच्या मते अभियांत्रिकी नियम, गर्दीचे मानसशास्त्र आणि प्रत्यक्ष प्रवासी वर्तन यांचा समन्वय साधला गेला नाही तर सुरक्षा उपाय धोकादायक ठरू शकतात. मुंबई उपनगरी लोकल व्यवस्था दररोज लाखो प्रवाशांच्या जीवनाशी निगडित असल्याने ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ ठरू नये, यासाठी उपाययोजनांचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी पुढे येत आहे.
बदलापूर घटनेत प्लॅटफॉर्मच्या रचनेवर प्रश्नचिन्ह
बदलापूर घटनेत प्लॅटफॉर्मच्या रचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. प्लॅटफॉर्मचा शेवटचा भाग रचनेवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. सीएसएमटी दिशेकडील प्लॅटफॉर्मचा शेवट पारंपरिक उतार (टेपर्ड एंड) स्वरूपात नसून सरळ उभा ठेवण्यात आल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले. अभियांत्रिकी पद्धतीनुसार अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्म शेवट उतारात सोडला जातो, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पडणाऱ्या व्यक्तीचा धक्का कमी होतो किंवा ती थेट रुळांमध्ये न जाता प्लॅटफॉर्मकडेला अडते. मात्र बदलापूर येथे उतार काढून टाकल्याने प्लॅटफॉर्म अचानक संपतो आणि खाली थेट मोकळी जागा निर्माण होते.
...तर जीव वाचला असता
बदलापूरमधील घटनेत संबंधित तरुणीचा तोल गेल्यानंतर ती प्लॅटफॉर्मवर कोसळण्याऐवजी थेट रुळांमध्ये गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर पारंपरिक उतार रचना अस्तित्वात असती, तर पडण्याचा वेग कमी होऊन ती प्लॅटफॉर्मकडेलाच अडली असती किंवा किरकोळ जखमी झाली असती. थेट रुळांमध्ये जाण्याचा धोका कमी झाला असता, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे संबंधित तरुणीचा जीव वाचला असता.
मोनिका मोरेप्रमाणेच बदलापूरमध्येही अपघात घडला. आता तरी रेल्वेने असे प्रयोग थांबवून प्लॅटफॉर्मचा शेवटचा भाग सुरक्षित करावा. बसविण्यात आलेल्या लोखंडी बॉक्सबाबतही पुनर्विचार करावा.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
प्रवासी सुरक्षेच्या नावाखाली रेल्वेकडून अविचारी उपाययोजना केल्या जातात. प्रवासी संघटनांशी चर्चा न करता प्रयोग राबविल्याने त्याचे परिणाम काय होतील याचा विचार होत नाही. कायमस्वरूपी आणि शाश्वत उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.
- लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय प्रवासी महासंघ
प्लॅटफॉर्मचा शेवटचा भाग कसा हवा?
प्लॅटफॉर्मचा शेवटचा भाग म्हणजे ‘प्लॅटफॉर्म एंड’ हा केवळ रचनात्मक भाग नसून तो सुरक्षा, रेल्वे गाड्यांच्या संचालनात्मक हालचाली आणि आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. रेल्वे अभियांत्रिकी मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा भाग साधारणपणे टेपर्ड म्हणजे उतारयुक्त ठेवला जातो.
उतारयुक्त का ठेवतात?
१. बाह्य प्रक्षेपणासाठी आवश्यक मोकळीक : प्लॅटफॉर्म ओलांडताना डब्यांचा बाहेरील भाग थोडा झुकतो. उतारामुळे सुरक्षित अंतर राखले जाते.
२. संरचनात्मक सुरक्षितता : सरळ भिंत किंवा उभा शेवट ठेवल्यास धडकेचा धोका वाढतो. उतार रचना धक्का कमी करते.
३. आपत्कालीन उतरण्याची सोय : अपघात, आग किंवा तांत्रिक बिघाडाच्या वेळी प्रवाशांना एंडमार्गे बाहेर काढणे सोपे जाते.
४. यार्डमधील रचना बदल हालचाली : यार्ड व टर्मिनस भागात ट्रेन हालचालीदरम्यान शेवटच्या टोकाची आवश्यक मोकळी जागा महत्त्वाची असते.
५. ड्रेनेज व्यवस्थापन : उतारामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. समतल एंडमध्ये पाणी साचण्याचा धोका असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.