लोकलच्या गर्दीने घेतला सोहमचा बळी
विद्यार्थ्यांसाठी राखीव डब्याची पुन्हा मागणी
संतोष दिवाडकर : सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. ११ : बारावीची परीक्षा देण्यासाठी घरून निघालेल्या सोहम कटरे या डोंबिवलीतील विद्यार्थ्याचा कळवा-मुंब्रादरम्यान लोकलमधून पडून मंगळवारी (ता. १०) मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे मुंबईतील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अपघातानंतर मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र राखीव डबा असावा, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आता पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
सोहम कटरे हा बारावीचा पेपर देण्यासाठी नेहमीप्रमाणे सकाळी रेल्वेने प्रवास करीत होता. मात्र सकाळच्या वेळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. कळवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. या भीषण अपघातात सोहमचा जागीच मृत्यू झाला. एका निष्पाप विद्यार्थ्याचा असा अंत झाल्याने रेल्वेच्या गर्दीच्या नियोजनावर टीका होत आहे.
मुंबई आणि उपनगरांतील मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज लाखो विद्यार्थी शिक्षण संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रवास करतात. या प्रवाशांसाठी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डबा असावा, यासाठी अनेक प्रवासी आणि विद्यार्थी संघटनांनी वारंवार निवेदने दिली आहेत; मात्र रेल्वे प्रशासनाने अद्याप याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची नाराजी प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे. गर्दीच्या वेळी विद्यार्थ्यांना चेंगराचेंगरी सहन करीत प्रवास करावा लागतो. यात आजवर अनेक विद्यार्थ्यांनी आपले प्राण गमावले आहेत, तर अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत. रेल्वेने आता तरी जागे व्हावे, अशी नाराजी प्रवासी संघटना व्यक्त करीत आहेत.
विद्यार्थी व प्रवासी संघटनांनी थेट केंद्र सरकारकडे डोळे लावले होते. रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी राखीव डब्यांची तरतूद केली जावी, अशी आशा केली जात होती. दरम्यान, अशी कोणतीही घोषणा झाली नाही. जर महिलांसाठी राखीव डबे असू शकतात तर देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र डबा का नाही, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
रेल्वेसमोरील आव्हाने
मुंबई लोकलमध्ये आधीच महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव जागा आहेत. अशात आणखी एक डबा राखीव केल्यास सामान्य डब्यांमधील गर्दी अनियंत्रित होऊ शकते, अशी भीती रेल्वे प्रशासनाला असण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा-कॉलेजांच्या वेळा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे हा डबा फक्त ठरावकी वेळेत राखीव ठेवायचा की पूर्ण वेळ, हा पेचही प्रशासनासमोर आहे.
...तर विद्यार्थ्यांसाठी राखीव डबा शक्य
अर्थसंकल्पात मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी २३८ नवीन वातानुकूलित लोकल गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. नवीन गाड्यांच्या आगमनामुळे रेल्वेची एकूण क्षमता वाढणार आहे. अशा वेळी जुन्या किंवा नवीन गाड्यांमधील एखादा डबा विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे प्रशासनाला तांत्रिकदृष्ट्या सोपे जाऊ शकते. रेल्वे सध्या १८ डब्यांच्या लोकलच्या चाचण्या घेत आहे. जर लोकलच्या डब्यांची संख्या १२ किंवा १५ वरून १८ झाली तर विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र डबा देणे अधिक व्यवहार्य होईल.
मोठमोठ्या श्रीमंत लोकप्रतिनिधींच्या मुलांना या बोगीची गरज नाही, मग कोणालाही याची गरज वाटली नाही. मुळात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचाच घराजवळ परीक्षा केंद्र द्यायला हवे. रेल्वे प्रवास सुखद नाही निदान सुरक्षित तरी करावा; मात्र याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचा निषेध आहे.
- लता अरगडे, अध्यक्ष-उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ
गर्दीच्या वेळी लोकलमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. भरधाव लोकलमध्ये लटकून प्रवास करणे विद्यार्थ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. लवकरात लवकर राखीव डबा विद्यार्थ्यांना मिळावा.
- रोहित राजगिरे, विद्यार्थी, कल्याण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.