कल्याणमध्ये रंगणार दिग्गज कलाकारांचा ‘पेशकार’
पद्मश्री विजय घाटे यांच्या तबलावादनाची मेजवानी
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : कल्याणमधील नामवंत तबला वादक व ज्येष्ठ गुरू कै. वि. बा. आलोणी यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी ‘पेशकार’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८:४५ वाजता कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे हा सोहळा पार पडणार आहे. होरायजन इव्हेंट्स आणि नृत्य साधना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘पेशकार’च्या मंचावर यापूर्वी पंडित अनिंदो चॅटर्जी, ओजस अधिया, आदित्य कल्याणपूर, सत्यजीत तळवलकर, यशवंत वैष्णव, ईशान घोष आणि स्वप्नील भिसे यांसारख्या नामवंत कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. हीच परंपरा कायम राखत यंदाही दोन विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम सत्रात तबला वादक स्वप्नील भाटे यांच्या संकल्पनेतून हा विशेष कार्यक्रम साकारला जाईल. यात स्वतः स्वप्नील भाटे (तबला) यांच्यासह डॉ. क्षमा कुलकर्णी (कथक), कौस्तुभ आपटे (गायन), सुधांशू घारपुरे (हार्मोनियम), राजू कुलकर्णी (ड्रम्स), प्रथमेश तारळकर (पखवाज) आणि ईशान भट (पढंत) असा विविध कलाकारांचा ताफा आपल्या कलेने रंगत वाढवणार आहे. द्वितीय सत्रात एकल तबला वादन होईल. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध तबला वादक पद्मश्री विजय घाटे यांचे एकल तबला वादन सादर होणार आहे. त्यांना सुरंजन खांडळकर (गायन) आणि अभिषेक सिनकर (हार्मोनियम) नगमा संगत करणार आहेत.
विनामूल्य प्रवेश
हा कार्यक्रम सर्व संगीतप्रेमींसाठी विनामूल्य आहे. मात्र, प्रवेशासाठी अधिकृत प्रवेशिका आवश्यक आहेत. या प्रवेशिका कल्याण गायन समाजाच्या कार्यालयात उपलब्ध असून, कार्यक्रमाच्या वेळी अत्रे रंगमंदिर येथेही मिळतील, अशी माहिती आयोजक प्रशांत दांडेकर यांनी दिली. नेहमीप्रमाणेच तबला, कथकप्रेमी रसिक तसेच संगीत शिकणारे विद्यार्थी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास स्वप्नील भाटे यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.