उरण, ता. ११ (बातमीदार) : तालुका परिसरात येत असलेले नवनवीन प्रकल्प आणि शेतीमध्ये उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आपल्या जमिनी विकू लागला आहे. यातच चिरनेरच्या शेतकरी बचत गटातील महिलांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून शेतीत नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत. चिरनेच्या बचत गटातील महिलांनी त्यांच्या मेहनतीतून अळंबी शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे.
उरण कृषी विभागातून आत्मा योजनेअंतर्गत महिलांना अळंबी उत्पादनासाठी आवश्यक साहित्य व मार्गदर्शन देण्यात आले. उरणच्या कृषी अधिकारी अर्चना सूळ आणि कृषी सहाय्यक अधिकारी सुषमा अंबुलगेकर यांच्या पुढाकारातून ही योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात यशस्वी करण्यात आली आहे. यामध्ये खरे पाहता बचत गटातील महिलांनी अथक मेहनत करून संधीचे सोने केले. तसेच प्रशिक्षण, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी अळंबी उत्पादनात समाधानकारक यश मिळवले.
स्वतःच्या कष्टावर उभे राहून आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण करणे, हे त्यांच्या आत्मविश्वासाचे आणि कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण आहे. यासाठी सोनाली जाधव, अंजली चिर्लेकर, ज्योती म्हात्रे, सुकन्या रसाळ, नेहा फोफेरकर, निर्मला भोईर, प्रणिता मोकल, रेवती ठाकूर, बिंदिया म्हात्रे, कामिनी हातनोलकर या महिला सहभागी झाल्या होत्या. तसेच शेतकरी प्रफुल खारपाटील यांनीही मोलाचे सहकार्य केले.
मूलद्रव्यांचा खजिना
अळंबी हे एक उच्च प्रथिने असलेले अन्न असून, ते पाचक आहे. आहारात समतोल राखण्यासाठी व शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेली मूलद्रव्ये अळंबीमध्ये असतात. अळंबीमध्ये ब-१, ब-२ व क जीवनसत्त्वे, पालाश, कॅल्शियम, सोडियम, स्फुरद, लोह इत्यादी भरपूर प्रमाणात आहेत.
लहान मुलांसाठी आवश्यक
अळंबीमध्ये शरीर वाढीसाठी आवश्यक अमिनो आम्ल असल्याने ते लहान मुलांना फारच उपयोगी अन्न म्हणून सिद्ध झाले आहे. अळंबीमध्ये पिष्टमय पदार्थ व शर्करा अत्यल्प प्रमाणात असल्याने उच्च रक्तदाब असणाऱ्यांना गुणकारी, आरोग्यवर्धक आहे. कर्करोग, हृदयरोग, अर्धांगवायू, संधिवात, मधुमेह अशा रुग्णांसाठीही आळंबी खाणे चांगले असते.
या प्रकल्पासाठी महिलांनी दाखविलेली तयारी आणि त्यांची चिकाटी, मेहनत यशस्वी ठरली आहे. रायगडच्या आत्मा प्रकल्प संचालक वंदना शिंदे यांनी प्रत्येक वेळी मार्गदर्शन केले. यापुढेही असे अनेक प्रकल्प शेतकऱ्यांसाठी राबविले जाणार आहेत.
- अर्चना सूळ,
उरण कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.