पोलिस ''रायडर्स'' ठरले परीक्षार्थींचे देवदूत
दोन दिवसांत २६ विद्यार्थ्यांचे वाचले शैक्षणिक वर्ष!
ठाणे शहर, ता. ११ (बातमीदार) : बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवसापासून ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या ''ट्रॅफिक रायडर्स'' उपक्रमाला अभूतपूर्व यश मिळत आहे. परीक्षेच्या पहिल्या दोन दिवसांत वाहतूक कोंडीत अडकलेल्या २६ विद्यार्थ्यांना पोलिसांनी तत्परतेने मदत करत वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवले. पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचा पेपर हुकण्याचा धोका टळला असून, त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान वाचले आहे.
वाहतूक नियंत्रण कक्षाकडे दोन दिवसांत मदतीसाठी एकूण २६ कॉल आले (१० फेब्रुवारीला २५ आणि ११ फेब्रुवारीला १ कॉल). रायडर्सनी तत्काळ संबंधित ठिकाणी पोहोचून विद्यार्थ्यांच्या मार्गातील कोंडी दूर केली. विशेष म्हणजे, एका ठिकाणी रस्ता मोकळा करणे शक्य नसल्याचे पाहून, रायडरने स्वतःच्या दुचाकीवर विद्यार्थ्याला बसवले आणि सायरन वाजवत थेट परीक्षा केंद्रापर्यंत सुरक्षित पोहोचवले.
५४ बाइक रायडर्सची फौज सज्ज
बारावी आणि दहावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि वाहतूक उप आयुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात ५४ बाईक रायडर्स तैनात करण्यात आले आहेत.
मुख्य उद्देश
वाहनातील बिघाड, रस्ता चुकणे किंवा वाहतूक कोंडी अशा कारणांमुळे परीक्षार्थींना उशीर होऊ नये. रायडर्स केवळ विद्यार्थ्यांना मदत करत नाहीत, तर त्यांच्यासाठी सिग्नल क्लिअर करणे, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे आणि आवश्यक ठिकाणी ''एस्कॉर्ट'' देण्याची जबाबदारीही चोख बजावत आहेत.
विद्यार्थ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
वाहतूक पोलिसांनी बजावलेल्या या मानवीय भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. हेल्पलाइनवर संपर्क साधताच अवघ्या काही मिनिटांत पोलीस मदतीला धावून येत असल्याने पालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. परीक्षेसाठी निघालेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला वाटेत अडचण आल्यास त्यांनी तातडीने वाहतूक विभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.