नांदेड : हसण्या-खेळण्याच्या बागडण्याच्या वयात आई एकक्षण जरी दूर गेली तर लहान मुले आई नजरेस पडत नाही तोपर्यंत शांत होत नाही. इथे तर नियतीने जग दाखविणाऱ्या आईला बालकांपासून कायमचे दूर नेले. ही बाब त्या चिमुकल्यांना समजण्याजोगी नसली तरी, तीन चिमुकल्यांच्या नजरा आईच्या हाकेसाठी आसूसल्या होत्या. आई दिसली तिही दोन दिवसांनी पण... ती नेहमीसारखी बोलत नव्हती. ना चिमुकल्यांना जवळ घेत होती. तिच्याजवळ जाण्यासाठी तिन्ही बालके हट्ट करत होते. पण आई काहीच प्रतिसाद देत नव्हती. आई आपल्यावर रुसली की काय? असे म्हणत कंठ दाटून टाहो फोडणाऱ्या चिमुकल्यांना आई देवाघरी गेली हे कळण्याचा आवाक्याबाहेर होते.
कोरोनाच्या तपासणीचा अडसर या काळात मयत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना भोगावा लागत आहे. याचाच एक प्रत्यय एका महिलेच्या निधनानंतर त्या कुटूंबाला आला, तो प्रसंग असा होता. नांदेडच्या भोईगल्ली (ब्रम्हपुरी) येथील एका २६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान शुक्रवारी (ता.पाच) संध्याकाळी मृत्यू झाला. या महिलेला एकूण तीन मुले. ज्यात एक पाच वर्षीय, चार वर्षीय आणि दोन वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे. या महिलेच्या मृत्यूला दोन दिवस झाले. आई दिसत नसल्याने हे तिन्ही चिमुकले घरी आई - आई म्हणून टाहो फोडत होते. आई या जगात नाही, हे त्यांना समजण्यापलिकडचे होते. घरी सांत्वनासाठी आलेल्या प्रत्येकाला त्या लेकरांकडे बघून हुंदका आवरता येत नव्हता. मृत्यू हा कुणालाही चुकलेला नाही. हे खरे असले तरी, कोरोनामुळे सध्या नात्यामधील ओलावा सुद्धा आटत चालला हे मात्र तितकेच खरे.
वटपौर्णिमेला घडली घटना
मागील दोन दिवसांपूर्वी वटपौर्णिमा होती. या दिवशी प्रत्येक महिला आपल्या सौभाग्यासाठी मांगल्याचे देणे मागते. त्याचदिवशी पत्नी आणि आईची भूमिका पार पाडणाऱ्या त्या महिलेच्या नशिबी आपल्याच आयुष्यासाठी झगडण्याची वेळ आली. परंतू, या दिवशी तिला मृत्यूने गाठले.
स्वॅब अहवाल येईपर्यंत मृतदेह शवागृहात
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि लगेच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर त्या व्यक्तींवर सर्वांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले जातात. परंतु, कोरोनाच्या काळात रुग्णालयात उपचारादरम्यान एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी त्याचा मृतदेह सहज नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. यासाठी शासनाने तसे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मृत्यू झालेल्या व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत आणि घेतलेल्या स्वॅबचा अहवाल येईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून तो मृतदेह रुग्णालयाच्या शवागृहात ठेवला जात आहे. या सर्व सोपस्कारात ना दूःख करता येतेय ना रडून मन हलके होतेय. शेवटचे दर्शन घेण्यासाठीसुध्दा शासकीय सोपस्कार पुर्ण करण्याची वेळ या कुटूंबावर आली आहे.
मृत्यू झालेल्या सर्वच व्यक्तींची स्वॅब चाचणी
रुग्णालयात मृत्यू झालेल्या सर्वच व्यक्तींची स्वॅब चाचणी केली जात आहे. त्यामुळे लॅबकडून रिपोर्ट मिळेपर्यंत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देता येत नाही. याशिवाय उशिर होण्याचे दुसरे काहीच कारण नाही.- डॉ. गोडबोले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.