नांदेड - कोरोना संसर्ग वाढत चालल्यामुळे रुग्णांची संख्याही वाढते आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ता. चार एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. मात्र, या संचारबंदीतून कोरोना संसर्गाची साखळी तुटण्याची गरज असून त्याची जबाबदारी आता सर्वांचीच राहणार आहे. गेल्या १४ दिवसात तब्बल ११ हजार ५२५ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत तर ८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर चार हजार ५१४ रुग्णांवर औषधोपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसांपासून एक हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर अतिगंभीर रुग्णांची आणि मृत्यूची संख्याही वाढली आहे. त्यामुळे गंभीर परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली असून गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांचाही प्रतिसाद चांगला मिळाला आहे. ता. चार एप्रिलपर्यंत असाच प्रतिसाद राहिला तर कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी होतील.
हेही वाचा - वेदनेला अंत नाही अन् कुणाला खंत नाही..!,नांदेडातील गोवर्धनघाटावर दिवसाला १९ मृतदेह, तर मसनजाळी केवळ बारा
नागरिकांचा दोन दिवस चांगला प्रतिसाद
पहिल्या दिवशी पोलिस तसेच जिल्हा आणि संबंधित पालिका प्रशासनाच्या वतीने संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू होती. आता येथून पुढेही ता. चार एप्रिलपर्यंत आणखी कडक कारवाई झाली आणि नागरिकांनी सहकार्य केले तर निच्शितच कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होणार आहे. संचारबंदी, लॉकडाउन नको असेल तर नागरिकांनी देखील विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच स्वतःची आणि कुटुंबांची काळजी घ्यावी तसेच मास्क, शारिरिक अंतर आणि सॅनीटायझर या त्रिसुत्रीचा वापर करावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कोरोनाचे अहवाल वेळेवर हवेत
जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना तपासणीसाठी संशयितांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. मात्र, त्याचा अहवाल येण्यास दोन - तीन दिवस लागत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम स्वॅब देणारा आणि त्याच्या कुटुंबियांवर होत आहे. पॉझिटिव्ह रुग्ण निघाला तर त्याने तोपर्यंत गृहविलगीकरणात किंवा बाजूला राहण्याची गरज आहे. पण तसे होताना दिसून येत नाही. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता कोरोना स्वॅबचे अहवाल वेळेवर यायला हवेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचायलाच हवे - हिंगोली : कोरोना काळातही टरबूजाचे विक्रमी उत्पन्न, सांडस येथील शेतकऱ्यांचा उपक्रम
होळी, धुलीवंदन, हल्लाबोल नाही
दरम्यान, कोरोनाचा वाढता संसर्ग आणि संचारबंदीच्या काळात होळी, धुलीवंदन तसेच हल्लाबोल हे कार्यक्रम येत आहेत. मात्र, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संचारबंदी लागू केल्यामुळे याबाबत होळी, धुलीवंदन, हल्लाबोल अशा गर्दी होणाऱ्या सणांना परवानगी देण्यात येणार नसल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. होळी, धुलीवंदनाचे सण नागरिकांनी आपआपल्या घरी साजरे करावेत. त्याचबरोबर हल्लाबोल मिरवणुकीसंदर्भातही प्रशासनातर्फे प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असून त्यासही परवानगी देण्यात येणार नसल्याचे श्री. शेवाळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.