नांदेड - जिल्ह्यातील एक हजार १५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या ता. १५ जानेवारी रोजी यासाठी मतदान होईल. ता. १५ डिसेंबर रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा कार्यक्रम योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. कोरोना संसर्गातंर्गत असलेले सर्व निकष ग्रामीण भागातील जनता पार पाडून सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्य निवडणुक आयोगाने शुक्रवारी (ता. ११) जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील एक हजार १५ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे ता. २३ ते ता. ३० डिसेंबर या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुटीच्या दिवस म्हणजेच ता. २५, २६ व २७ डिसेंबर हे दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी ता. ३१ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून होईल. नामनिर्देशनपत्रे ता. चार जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेता येतील. याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी दुपारी तीन वाजल्यानंतर प्रसिद्धी केली जाईल.
आचारसंहिता झाली लागू
ता. १५ जानेवारी रोजी मतदान तर ता. १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना ता. २१ जानेवारीपर्यंत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता आगामी काळात ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे राजकारण जिल्ह्यात तापण्यास सुरुवात होणार असून त्याचबरोबर थंडीच्या वातावरणात आरोप - प्रत्यारोपांच्या फैरीही झडलेल्या मतदारांना पहायला मिळणार आहेत.
कोरोना संसर्गामुळे होती स्थगिती
एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ता. ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते; परंतु कोरोना संसर्गाची परिस्थिती उद्भवल्याने ता. १७ मार्च २०२० रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात नांदेड जिल्ह्यातील एक हजार १५ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
हेही वाचलेच पाहिजे - वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव घेवून खुद्द शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार- परभणीकर संघर्ष समितीच्या लढ्याला पहिले यश
निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या
मुखेड तालुक्यात १०९ ग्रामपंचायत, हदगाव - १०८, कंधार - ९८, देगलूर - ८५, लोहा - ८४, नायगाव - ६८, नांदेड - ६५, बिलोली - ६४, भोकर - ६३, उमरी - ५७, हिमायतनगर - ५०, मुदखेड - ४५, अर्धापूर - ४३, धर्माबाद - ४०, किनवट - २६, माहूर - दहा अशा एकुण एक हजार १५ ग्रामपंचायतींसाठी हा निवडणुकांचा कार्यक्रम आहे.
२५ सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य
विधानसभा मतदारसंघाची ता. २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या ता. एक डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ता. सात डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या ता. १४ डिसेंबर रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत, अशी माहितीही निवडणुक विभागातर्फे देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.