नांदेड : तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण व त्यामुळे आरोग्यावरील होणारे दुष्परिणाम लक्षात घेता राज्यात तंबाखू सेवनावर अनेक निर्बंध घातले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी एका अध्यादेशाद्वारे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि खासगी शिकवणी स्वातंत्र्यदिनी ता. १५ आॅगस्टपूर्वी तंबाखूमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी तसेच सर्व कार्यालये, संस्थांमध्ये आणि संस्थेच्या तीनशे फुट अंतरामध्ये धुम्रपान तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ जसे की पान मसाला, गुटखा आदी सेवन करणे अथवा विक्री करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. सर्व कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर तंबाखू दान पेटी ठेवण्याचे देखील आदेशात नमूद आहे. त्यामुळे आता कार्यालयामध्ये प्रवेश करण्याच्या आधी सर्व प्रकारचे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ या दानपेटीत टाकूनच कार्यालयात प्रवेश करावा लागणार आहे. कार्यालयीन वेळेत तंबाखू सेवन केल्यास किंवा सोबत बाळगल्यास कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार दोनशे रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो, हा दंड संस्थाप्रमुख लावू शकतात.
तसेच जिल्ह्यात तंबाखू धाड पथक स्थापन करण्यात आले असून या पथकामार्फत उल्लंघन करणाऱ्यांना सोबतच उल्लंघन होत असलेल्या संस्था प्रमुखाला दंड लावण्यात येणार आहे. सर्व कार्यालये प्रमुखांनी यावर्षी ता. १५ ऑगस्टच्या आधी आपले कार्यालय तंबाखूमुक्त घोषित करावयाचे आहे.
सर्व शाळा, महाविद्यालये आणि खासगी शिकवणी यांनी तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्थेंचे निकष या वर्षी ता. १५ ऑगस्टच्या आधी पूर्ण करणे बंधनकारक आहे. सर्व निकष पूर्ण केलेल्या शैक्षणिक संस्थाना तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था असे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था आणि कार्यालये करण्यासाठी तांत्रिक मदत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांच्यामार्फत करण्यात येईल.
सार्वजनिक ठिकाणी कोटपा कायद्याचे उल्लंघन होत असल्यात अथवा तंबाखू सेवनाबाबत तक्रार नोंदवण्यासाठी तसेच तंबाखू व्यसन सोडण्यासाठी १८००११०४५६ किंवा १८००११२ ३५६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.
- डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्य चिकित्सक.
या निर्बंधांमुळे सर्व कार्यालये आणि शैक्षणिक संस्था तंबाखू, गुटखा खाऊन थुंकल्यामुळे विद्रूप करणे तसेच थुंकीद्वारे पसरणारे संसर्गजन्य रोग यांवर अटकाव आणता येऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी या नियमांचे तंतोतंत पालन करावे.
- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.