सांगली ः कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने चिंतेचे वातावरण असताना शासनाच्याच आकडेवारीने यामध्ये भर घातली आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा काल सोमवारी 49 हजार पार गेल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आकडेवारीतून समोर आले असले; तरी शासनाच्याच "कोविड 19 डॅशबोर्ड' वर हाच आकडा 51876 दाखवण्यात आला आहे. या दोन्ही आकडेवारीत तब्बल 2872 चा फरक आहे. मात्र परप्रांतातील रुग्णसंख्येमुळे हा फरक दिसत असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.
जिल्ह्यात गेल्या वर्षी 23 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर हळूहळू कोरोनाने आपला विळखा घट्ट करत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाने कहर केला होता. गेल्या तीन-चार महिन्यांत कोरोनाच्या संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवल्याचे दिसत होते. मात्र मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे दैनंदिन रुग्णांचा आकडाही गतीने वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांत प्रथमच बाधितांचा एकाच दिवशी आकडा 84 पर्यंत गेला.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत असलेल्या आकडेवारीत जिल्ह्यात सोमवार अखेर रुग्णांची संख्या 49 हजार 4 झाली आहे. यातील 46 हजार 860 जण बरे झाले आहेत, तर 1769 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र राज्य शासनाच्या "कोविड 19 डॅशबोर्ड' या पोर्टलवर जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 51 हजार 876 इतकी असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या 49 हजार 304, तसेच मृतांचा आकडा 1801 आहे. म्हणजे मृत रुग्णांचा आकडाही 90 ने जास्त आहे. यामध्ये बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून मृत्यू दर 3.5 टक्के इतका दाखवण्यात आला आहे.
वस्तुस्थिती काय?
याबाबत प्रशासनाशी संपर्क साधून माहिती घेतली. जिल्ह्याची आकडेवारी आणि सांगलीत येऊन तपासणी केलेल्या परप्रांतीय रुग्णांची आकडेवारी असा हा फरक आहे. जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी प्रसिद्ध करते. मात्र सरकारकडे आकडेवारी पाठवताना सांगली जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये बाहेरच्या जिल्ह्यातील, राज्यातील रुग्णांनी येऊन तपासणी करून घेतली असल्यास, त्यांचाही आकडा शासनाला कळवावा लागतो. त्यामुळे जिल्ह्याची आकडेवारी शासनाच्या पोर्टलवर जास्त दिसते.
जिल्ह्यात 87 जणांना कोरोना
सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात 87 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोनाचे उपचार घेणाऱ्यांची संख्याही वाढली असून सध्या 430 जणांवर उपचार सुरू आहेत. महापालिका क्षेत्रात चिंता वाढली असून दिवसात 31 जणांना बाधा झाली आहे.
आज 497 जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यात 50 जण बाधित आढळले. अँटीजेन तपासण्या 472 जणांच्या झाल्या, त्यात 37 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आटपाडी तालुक्यातील 12, जत 22, खानापूर 3, मिरज 3, शिराळा 2, तासगाव 5 तर वाळवा तालुक्यातील 9 जण बाधित आढळले आहेत. सध्या 37 जण ऑक्सिजनवर आहेत.
आजअखेर कोरोना बाधितांची संख्या 49 हजार 91 झाली आहे. 46 हजार 892 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृतांची आजअखेरची संख्या 1769 आहे. गेल्या आठ दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कालपासून आकडा 80 पेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधाची काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.