बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर निवडणुकीत मोठा ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे. महापालिकेत भाजपकडे बहुमत आहे; पण त्यांच्याकडे उपमहापौरपदासाठी उमेदवारच नाही. उपमहापौरपद इतर मागास ‘ब’ प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे;
पण या प्रवर्गातील दोनच नगरसेविका आहेत. त्यापैकी वैशाली भातकांडे या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आहेत. दुसऱ्या ज्योती राजू कडोलकर या कॉंग्रेसच्या आहेत. त्यामुळे सहा फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत भाजपला महापौरपद मिळेल; पण उपमहापौरपद मिळणार नाही, अशी स्थिती सध्या आहे.
वैशाली भातकांडे व ज्योती कडोलकर यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे; पण सध्या तरी दोन्ही नगरसेविकांनी भाजपची ही ऑफर नाकारल्याची चर्चा आहे. उपमहापौरपदाचे आरक्षण बदलण्याचा प्रयत्नही सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे; पण तसे झाल्यास विरोधी गटाकडून त्याला आक्षेप घेतला जाऊ शकतो. ओबीसी आरक्षणाला स्थगिती असताना महापौर-उपमहापौर निवडणूक घेतली जात आहे.
बेळगावचे महापौरपद सामान्य महिलेसाठी राखीव आहे. या प्रवर्गातील नगरसेविका भाजपकडे आहेत; पण ओसीबी बी महिला या प्रवर्गातील नगरसेविका भाजपकडे नाही. त्यामुळे यावेळी उपमहापौर निवडणुकीत रंगत येणार, हे नक्की आहे.
महापालिकेतील ५८ नगरसेवकांपैकी ३५ नगरसेवक भाजपचे आहेत. याशिवाय महापौर निवडणुकीत मतदान करणारे सात पदसिद्ध सदस्यांपैकी पाच सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपचे संख्याबळ ४० आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे भाजपला मिळू शकतात; पण आरक्षणामुळे भाजपची गोची झाली आहे.
सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत ओबीसी बी महिला या प्रवर्गातून भाजपची एकही नगरसेविका निवडून आलेली नाही. त्यामुळे हे पद भाजपला सोडून द्यावे लागणार, अशीच स्थिती सध्या आहे. २०१८ मध्ये महापालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता असताना महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. त्यावेळी समितीकडे या प्रवर्गातील नगरसेवक नसल्यामुळे बसाप्पा चिक्कलदिन्नी यांची या पदावर बिनविरोध निवड झाली होती. या वेळी उपमहापौर निवडणुकीत अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मोर्चेबांधणी जोरात
भाजपने या पदावर पाणी सोडले तरी कडोलकर किंवा भातकांडे यापैकी कोणाला संधी मिळणार? भाजपकडून त्यांना मतदान केले जाणार का? विरोधी गटाकडून कडोलकर किंवा भातकांडे या दोहोंपैकी एकाचीच उमेदवारी दिली जाणार का? असे प्रश्नही उपस्थित झाले आहेत. सध्या भातकांडे व कडोलकर या दोघांकडून उपमहापौरपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कडोलकर या प्रभाग क्रमांक ३ च्या तर भातकांडे या प्रभाग क्रमांक १० च्या नगरसेविका आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.