सांगली ः जिल्ह्यात कोरोनाची दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेवून महापालिकेसह ग्रामीण भागात 22 खासगी रुग्णालय बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट अंतर्गत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सज्ज आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शासकीय आणि खासगी रुग्णालयात मिळून 2 हजार 120 बेड असून चौदाशे बेडला ऑक्सिजन जोडण्यात आला आहे. याशिवाय 4 हजार रेमडिसीवीर इंजेक्शनचा साठा आहे, त्याचा काळाबाजार होणार नाही, याबाबतची दक्षता घेतली आहे.
कोरोना लाटेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ. चौधरी बोलत होते. सद्य:स्थितीत कोरोनाची दुसरी लाट सुरू असून शासनस्तरावर अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. ग्रामीण क्षेत्रातसुद्धा प्रतिबंधात्मक व उपचारात्मक काम सुरू आहे. सद्य:स्थितीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपचारासाठी सांगली, मिरज शहरासह तालुक्याच्या ठिकाणावरील खासगी मिळून 22 रुग्णालयांत कोव्हिड रुग्णांवरील उपचारासाठी आरक्षित करण्यात आली आहेत. याठिकाणी कोविड रुग्णांसाठी आयसीयु व आयसोलेशन वार्ड तयार केले आहेत.
या रुग्णालयांमध्ये कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यात यावेत, त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या उपचार प्रणालींच्या मार्गदर्शन सूचनांच्या अधिन राहून उपचार करण्यात यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयातील व्यवस्था आणि बिलांबाबत प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबतची दक्षता घेवून प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. बिलांबाबत गोंधळ निर्माण होवू नये, यासाठी बिलांची ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले की, मिरज शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, तसेच कोविड केअर सेंटरमधून 2 हजार 120 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये चौदाशे बेडला ऑक्सिजन जोडण्यात आला आहे. 560 बेड आयसीयुचे उपलब्ध आहेत. सध्या 529 रुग्ण ऍडमिट असल्याने बेडबाबत रुग्णांची गैरसोय होणार नाही.
पुणे, मुंबई आणि रायगड येथून ऑक्सिनजचा पुरवठा होता. त्याचा साठा करून ठेवण्यात आला आहे. 13 टन कंन्झंम्शनपर्यंत वापर करण्यात येईल. याशिवाय बफरस्टॉक केला जाणार आहे. सध्या 4 हजार 84 रेमडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध आहेत. याशिवाय आणखी 4 हजार रेमडिसीवीरची मागणी करण्यात आली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या रकमेमध्ये इंजेक्शन मिळेल. त्यामुळे रेमडिसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे उपस्थित होते.
खासगी रुग्णालयातील प्रत्येक बिलाचे ऑडिट...
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले,""कोरोना उपचारासाठी आरक्षित केलेल्या खासगी रुग्णालयातील व्यवस्था आणि बिलांबाबत प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबतची दक्षता घेवून प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. बिलांबाबत गोंधळ निर्माण होवू नये, यासाठी खासगी रुगणालयात झालेल्या बिलांची ऑडिट करून बिल भरले जाईल, याची दक्षता घेतली जाणार आहे.''
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.