श्रीगोंदे : कोरोना विषाणूपासून बचावासाठी "जनता कर्फ्यू'ला तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र त्याच वेळी, पुण्या-मुंबईतून येणाऱ्या नातेवाइकांचीच आता येथील लोकांना भीती वाटू लागली आहे. गावी परतणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, याबाबत प्रशासन लवकरच काही हालचाली करणार असल्याचे समजते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यात कमालीची सावधगिरी बाळगली जात आहे. महसूल, पोलिस आणि आरोग्य विभाग एकत्रितपणे लोकांची मानसिकता तयार करतानाच, कोरोनापासून बचावासाठी जनजागृती करीत आहेत.
हेही वाचा - कोण आहे ज्योतिषी, बाराही राशींचं भविष्य ठरलं तंतोतंत खरं
नोकरी- व्यवसायाच्या निमित्ताने येथील तरुण पुण्या-मुंबईत स्थायिक झाले आहेत. मात्र, सध्या या दोन महत्त्वाच्या शहरांतच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे "गावाकडे फिरा,' असा निरोप नातेवाइकांनी दिला. जिवाच्या भीतीने या लोकांनी गावाची वाट धरली खरी; मात्र आता त्यांच्या रूपाने कोरोना विषाणू तर गावात येत नाही ना, अशी भीती स्थानिक लोकांमध्ये बळावत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गावी परतणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
काही दिवसांत एकट्या पुण्यातून श्रीगोंद्यात येणाऱ्यांची संख्या दोन ते अडीच हजारांवर गेल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, त्यांची कोणतीही तपासणी झालेली नसल्याने, त्यांच्या माध्यमातून गावापर्यंत कोरोना येऊ नये, याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. शिवाय, अनेक परप्रांतीय येथे व्यवसाय व कामाच्या शोधात आले आहेत. त्यांच्यावरही स्थानिकांना बारीक लक्ष ठेवावे लागेल.
शहरातून गावाकडे येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी झाली तर भीतीचे, संशयाचे वातावरण राहणार नाही. नाहक चर्चा करून एखाद्याची बदनामी करण्यापेक्षा प्रशासनाने गावी परतणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करावी.
- संपत दरेकर, ज्येष्ठ नागरिक, हिरडगाव
शहरातून आलेल्या लोकांविषयी काळजीचे वातावरण असले, तरी प्रशासन तत्पर आहे. अशा लोकांची माहिती काढण्याची जबाबदारी तलाठी, पोलिस पाटलांवर सोपविणार आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून माहिती मागविणार आहोत.
- महेंद्र माळी, तहसीलदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.