डाव्या-पुरोगामी चळवळींसाठी प्राण पणाला लावणारे आणि परिघाबाहेर फेकलेल्या फाटक्या, तुटक्या माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी झगडणारे बहुआयामी ‘लोकनेते’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्र डॉ. एन. डी. पाटील यांना ओळखत होता.
- प्रा. एकनाथ पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर
डाव्या-पुरोगामी चळवळींसाठी प्राण पणाला लावणारे आणि परिघाबाहेर फेकलेल्या फाटक्या, तुटक्या माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी झगडणारे बहुआयामी ‘लोकनेते’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्र डॉ. एन. डी. पाटील यांना ओळखत होता. परिवर्तनवादी चळवळीसाठी ‘एनडी’ ही दोन अक्षरं रस्त्यावरच्या निकराच्या ‘संघर्षाचं प्रतीक’ होती. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी, महर्षी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा समन्वय त्यांच्या आचार-विचारात होता. कणखर वैचारिक भूमिका हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मूळ गाभा होता. कार्यकर्ते घडविणारी कार्यशाळा म्हणून चळवळीतील नवी पिढी आजही त्यांच्या आयुष्याकडे पाहते. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त...
ढवळी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे कृष्णाबाई आणि ज्ञानदेव पाटील या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी डॉ. एन. डी. पाटील यांचा जन्म झाला. पेठवडगाव येथील दारू दुकान बंद करण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना आयुष्यातला पहिला कारावास भोगावा लागला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकारच्या चळवळीने भारलेले वातावरण आणि राष्ट्र सेवा दलाचे संस्कार यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.
विद्यार्थिदशेत पांडुरंग परीट, आर. व्ही. खैरमोडे, ए. डी. अत्तार या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. सामान्य माणसांसाठी आयुष्य झिजवण्याचा वसा आणि वारसा त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडून मिळाला. मृत्युशय्येवर असताना हॉस्पिटलमधून रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाला विशेष पत्र लिहून ‘रयत’चे सभासद करण्याबाबत अण्णांनी दाखविलेला विश्वास ‘रयत’चे चेअरमन म्हणून पुढे आयुष्यभर एन. डी. पाटील यांनी सार्थ ठरविला. अण्णांच्या ध्येयधोरणांपासून ‘रयत’ तसूभरही हलणार नाही, याची दक्षता आयुष्यभर निष्ठेने घेतली.
स्वातंत्र्याच्या स्थित्यंतरादरम्यान शोषित-वंचितांच्या हक्कांसाठी काळाची गरज म्हणून अस्तित्वात आलेल्या आणि खुद्द कर्मवीर अण्णा, क्रांतिसिंह नाना पाटील संस्थापक-सदस्य असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या तत्त्वज्ञानाकडे ते ओढले गेले. पक्षाच्या मुखपत्राचे गठ्ठे हातावर घेऊन मथळे ओरडत मुखपत्र विकणारा तरुण कार्यकर्ता ते पक्षाचा प्रमुख मार्गदर्शक हा त्यांचा सुमारे सत्तर वर्षांचा एकपक्षीय प्रवास स्तीमित करणारा आहे. १९७२ मध्ये दुष्काळग्रस्त जनतेच्या मागण्यांसाठी इस्लामपूर कचेरीवर त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चावर शासनाने गोळीबार केला. त्यात त्यांच्या पुतण्यासह चार कार्यकर्ते हुतात्मे झाले, तरीही खचून न जाता हा लढा त्यांनी नेटाने लढवला. गोळीबाराच्या या घटनेनंतर हुतात्म्यांच्या वारसांसाठी स्वतःच्या कमाईतून पेन्शन योजना सुरू करून सामाजिक बांधिलकीचा नवा पायंडा त्यांनी पाडला. ही योजना गेली पन्नास वर्षे अखंड सुरू आहे. विधान परिषदेत अठरा, विधानसभेत पाच अशी एकूण तेवीस वर्षे ते लोकांचे आमदार होते. या दरम्यान सहकारमंत्री म्हणून प्रसंगी नियमात बदल करून लोकांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले. शेती आणि शिक्षण हे त्यांच्या आस्थेचे विषय होते. शेतकऱ्यांनी संघटितपणे संघर्ष करण्याचा पर्याय ते सुचवित आले.
‘एनरॉन’ची वीज वारेमाप दराने घेण्यावाचून गत्यंतर नसल्याच्या टप्प्यावर त्यांनी ‘एनरॉन’ विरुद्ध रान उठविले आणि सरकारला प्रकल्प रद्द करावा लागला. गरीब शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनीवर गंडांतर आणणारा रायगडचा ‘सेझ’ प्रकल्पही त्यांच्या हस्तक्षेपामुळेच सरकारला गुंडाळावा लागला. ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या साथीने कोल्हापूरच्या टोलला त्यांनी टोला दिला. गेली अनेक वर्षे सीमावासीयांवरील अन्यायाला ते वाचा फोडत आले होते.
आपल्या अखेरच्या दिवसापर्यंत हा प्रश्न सुटला नसल्याची खंत त्यांच्या मनात होती. परिणामांची फिकीर न करता वयाच्या नव्वदीनंतरही रस्त्यावर उभे राहून ते लोकांना आंदोलनाची हाक देत होते. संघर्षाच्या प्रश्नांवर अंतर्गत मतभेद विसरून सर्व डाव्या चळवळींनी एकत्र यायला हवे. महाराष्ट्रभरातल्या सर्व डाव्या पुरोगामी चळवळींना एकमुखी नेतृत्व देण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये होते. छोट्या-मोठ्या पुरोगामी चळवळींचे ते आधारवड होते. त्यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळींची अपरिमित हानी झाली आहे.
चळवळींच्या दृष्टीने आजचा काळ सर्वार्थाने कठीण आहे. अनेक सामाजिक प्रश्न दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत आहेत आणि त्यासाठीच्या विधायक संघर्षाचा अवकाश कमालीचा संकुचित होत निघाला आहे. या कठीण काळात भावी पिढ्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या भरण-पोषणासाठी त्यांच्या विचारकार्याचे जतन करणे आवश्यक आहे. त्यामधूनचच उद्याच्या चळवळींच्या यशाचे शास्त्र आणि शस्रं विकसित होणार आहेत. त्यांचे विचार उद्याच्या अनेक पिढ्यांना दीपस्तंभासारखे प्रकाश दाखवत राहतील, संघर्षांची प्रेरणा देत राहतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.