सांगली : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी लवकरच होत आहे. 89 हजार 958 कर्जदार शेतकऱ्यांना 528 कोटी रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. बॅंकांकडून कर्जदारांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. कर्जमुक्तीच्या याद्या 21 फेब्रुवारीपासून गावांत प्रसिध्द केल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या आधार लिंकींग झाले नसून त्याच्या तात्काळ कार्यवाहीचे आदेश बॅंकाना देण्यात आलेत, असेही ते म्हणाले.
सरकारने जाहिर केलेली कर्जमाफी अटींशिवाय असणार आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज, हेलपाटे घालावे लागणार नाहीत. ही कर्जमाफी सुटसुटीत असल्याचा दावा सरकारने केला आहे. प्रारंभी दोन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी मिळणार आहे. तेसे जाहीर करण्यात आले आहे.
डॉ. चौधरी म्हणाले,""एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल घेतलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यांत अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली आणि परतफेड न झालेली रक्कम 2 लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांना अल्प, अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्जखात्यात 2 लाखापर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची कार्यवाही जिल्हा प्रशासन आणि बॅंकाकडून सुरु करण्यात आली आहे. एखाद्या शेतकऱ्यांचे एक-दोन बॅंकात कर्ज आहे. मात्र ती रक्कम दोन लाखाच्या आतील आहे, त्यांनाही कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.''
ते म्हणाले,""कर्जमुक्ती योजनेसाठी कर्जदारांच्या याद्या अपलोड करण्याचे काम 1 फेब्रुवारीपासून सुरु झाले आहे. 89 हजार 958 कर्जदार शेतकऱ्यांची यादी अपलोड करावी लागणार आहे. 86 हजार 121 कर्जदारांच्या यादी अपलोड करण्याचे काम आज पूर्ण झाले. अवघ्या 3 हजार 837 शेतकऱ्यांची यादी प्रलंबित आहे. बुधवारपर्यंत ते पूर्ण होईल. कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकऱ्यांची याद्या 21 फेब्रुवारीपासून गावागावांत चावडी किंवा ग्रामपंचायतीच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात 90 हजार शेतकऱ्यांना 528 कोटींची कर्जमाफी मिळणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सहकारी साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकांसह शासकीय कर्मचाऱ्यांची नावेही याद्यात आहेत. लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि राष्ट्रीयीकृत बॅंकातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात त्रुटी आहेत. काही शेतकऱ्यांचे आधार लिंकींग झालेले नाही. त्यांचे तात्काळी आधार जोडणी करुन घ्यावी, अशा सूचना बॅंकांना देण्यात आल्या आहेत.''
जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे उपस्थित होते.
यादीत नाव नसल्यास तहसिदारांकडे अर्ज करा
दोन लाखापर्यंतच्या थकित कर्जासाठी शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहे, मात्र यादीत नाव नसल्यास त्यांनी तहसिलदारांकर्ड अर्ज करावा, असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले. ज्यांना कर्जमाफीचा लाभ नको, त्यांनी जिल्हास्तरीय समितीकडे रितसर अर्ज करावा. त्याची पडताळणी समितीकडून केली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.