सांगली : जिल्ह्यात एकुण रुग्णांपैकी शंभर जण कोरोनामुक्त झाल्याची दिलासादायक चित्र समोर आले आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात नवे चार रुग्ण आढळले आहेत. आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे दोन रुग्ण, तर किनरेवाडी (शिराळा), विहापूर (कडेगाव) येथे प्रत्येकी एक रुग्ण मिळून आले आहेत. रुग्णांची संख्या 182 झाली असून सध्यस्थितीत 71 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून पाच कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
निंबवडेत मुंबईहुने आले दोन पॉझिटिव्ह
आटपाडी ः निंबवडे (ता. आटपाडी) येथे मुंबईहून आलेल्या दोन वेगवेगळ्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. प्रशासनाने हे दोन्ही रुग्ण राहत असलेला परिसर कंटेनमेंट झोन सील केला. आटपाडी तालुक्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23 वर पोहोचली आहे. यामधील सात जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
निंबावडे येथे मुंबईहून एक कुटुंब पंधरा दिवसापूर्वी आले होते. त्यांना शाळेवर क्वारंटाइन केले होते. त्यांचा क्वारंटाइन संपल्याने कालच त्यांना घरी सोडले होते. तर दुसऱ्या रुग्णाच्या साऱ्याच कुटुंबांना राहत्या घरी क्वारंटाइन केले होते. आरोग्य विभागाने तालुक्यात बाहेरून आलेल्या ज्येष्ठ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. यात निंबवडेतील या दोन ज्येष्ठ व्यक्तींचा कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आला. यामध्ये एक महिला आणि एक पुरुष असून ते मुंबईवरून गावी आले होते. यातील एका रुग्णांमध्ये प्राथमिक लक्षणे आढळून आली होती तर दुसऱ्या रूग्णांमध्ये कोणतीही प्राथमिक लक्षणे आढळून आली नव्हती. निंबवडेत एकाच दिवशी दोन रुग्ण सापडल्यामुळे पोलिस, प्रशासन आणि आरोग्य विभागाची धावपळ उडाली होती. तहसीलदार सचिन लंगुटे, तालुका वैद्यकीय अधिकारी साधना पवार यांनी गावाला भेट दिली.
विहापूर येथे मुंबईहुन आलेल्या वृद्धास बाधा
कडेगाव : विहापूर (ता.कडेगाव) येथील मुंबईहून आलेल्या 82 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कोरोना चाचणी आज दुपारी अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती कडेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांनी दिली. कडेगाव तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 17 वर पोहोचली आहे. त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण कायम आहे.
विहापूर मेंढ पुनर्वसन वसाहतीतील 82 वर्षीय वृद्ध व्यक्ती, मुलगा सून व दोन नातू असे एकूण पाचजण बुधवारी (ता.3) मुंबई येथून विहापूर येथे आले होते. त्यामुळे आरोग्य विभागाने या पाच जणांना होम क्वारंटाइन केले होते. दरम्यान यापैकी 82 वर्षीय वृद्ध व्यक्तीला सर्दी, ताप व खोकला आदी कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी याबाबत आरोग्य विभागाला सांगितले असता आरोग्य विभागाने त्यांना रविवारी (ता.7) मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती कडेगाव तालुका आरोग्य विभागाला मिळताच आरोग्य विभागाने संबंधित कोरोना बाधीत व्यक्तीची सून व दोन नातवंडे व शेजारील अन्य दोघे असे एकूण पाच जणांना कडेगाव येथे शासकीय वसतिगृहात संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. तहसीलदार डॉ.शैलजा पाटील, प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड, गटविकास अधिकारी दाजी दाईगडे, पोलिस निरीक्षक विपीन हसबनिस यांनी तात्काळ विहापूर येथे धाव घेवून येथील मेंढ पुनर्वसन वसाहतीचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला. तर या वसाहतीकडे जाणारे सर्व रस्ते सील केले. तर आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु केली आहे.
किनरेवाडीत युवकास लागण
शिराळा : किनरेवाडी (ता.शिराळा) येथील मुंबईहून आलेल्या 35 वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यातील रुग्णाची संख्या 44 तर पश्चिम भागातील रुग्णांची संख्या 34 झाली आहे.
सदर युवक मुंबईहून 6 जून रोजी आपल्या पत्नीसह आला होता. तो जिल्हापरिषद शाळेत क्वारंटाइन झाला होता. त्यास त्रास जाणवू लागल्याने 7 जून रोजी मिरज येथे नेण्यात आले होते. त्याचा आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पणुंब्रे वरूण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्याच्या पश्चिम विभागात दिवसेंदिवस कोरणा रुग्णांची संख्या वाढत असल्याने लोकांच्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. किनरेवाडी येथे गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण पाटील, मंडल अधिकारी पी. पी. जाधव यांनी भेट देऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत. सरपंच राकेश सुतार, उपसरपंच परशु पाटील, माजी सरपंच सदाशिव पवार, ग्रामसेवक एस.डी.जगताप, तलाठी एम.बी.सातपुते यांनीही पाहणी केली. तालुक्यात निगडी (4), रेड (3) , अंत्री खुर्द (1), मोहरे (2), खिरवडे (2), करुंगली (1), चिंचोली (1), मणदूर (20), काळोखेवाडी (2), रिळे (4), माळेवाडी (1), मांगले (2), किनरेवाडी (1) असे एकूण 44 रुग्ण झाले आहेत. निगडी (3), रेड (3), चिंचोली (1), करुंगली (1), मोहरे (1), मणदूर (1), खिरवडे (1) असे 11 कोरोना मुक्त झाले आहेत.
सहा चिंताजनक, पाच कोरोनामुक्त
साळसिंगे (खानापूर) येथील 60 वर्षीय व्यक्ती, कडेबिसरीतील 48 वर्षीय व्यक्ती, खिरवडे (ता. शिराळा) येथील 56 वर्षीय पुरुष, मणदूर (शिराळा) येथील 81 वर्षीय व्यक्ती, कदमवाडी (कवठेमहांकाळ) येथील 50 वर्षीय महिला, विटा (हनुमंतनगर) येथील 34 वर्षीय पुरूष अशा सहा यांची प्रकृती चिंताजनक आहे. झोळंबी वसाहत आष्टा (वाळवा), शेटफळे (आटपाडी), मणदुर येथील दोन, रिळे (शिराळा) येथील पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले.
जिल्ह्याची स्थिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.