Kavita Rathod
Kavita Rathod Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Success Story : MPSC त बंजारा समाजातील मुलीने एकाच वेळी मिळवली दोन पदे! अद्याप कविताच्या घरापर्यंत वीज, पाणी नाहीच!

धर्मवीर पाटील

इस्लामपूर : बंजारा समाजातील कविता राठोड ही युवती लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एकाच वेळी दोन पदे मिळवत राज्यात पहिली आणि चौथी आली आहे. जत तालुक्यातील आसंगी तुर्क हे तिचे गाव.

तिने तिच्या यशाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे; परंतु आजही या क्षणाला विकसित म्हणवल्या जाणाऱ्या या महाराष्ट्रात तिच्या घरापर्यंत वीज आणि पाण्याची सोय उपलब्ध होऊ शकलेली नाहीये, हे अत्यंत दुर्दैवी वास्तवही पुढे आलेले आहे.

कविताच्या यशाची दखल घेतली जाण्याबरोबरच या असुविधांच्या फेऱ्यात अडकलेल्या समाजाकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष जाणार आहे का? हा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे. विहीर खोदताना कातळ फोडणाऱ्या हातांनी आपल्या मुलीला काहीही कमी पडू न देता शिकवले.

त्यांच्या कष्टाची आणि कुटुंबाकडून मिळणाऱ्या साथीची जाणीव ठेवत आसंगी तुर्क (ता. जत) सारख्या दुष्काळी भागातील कविता भिमु राठोड या मुलीने एकाचवेळी कर सहायक म्हणून भटक्या विमुक्त जाती अ प्रवर्गात राज्यात पहिली तर मंत्रालय लिपिक म्हणूनही राज्यात चौथी येण्याचा मान मिळवला आहे.

कविता ज्याठिकाणी राहते, तिथे शासनाकडून पाणी आणि वीज या मूलभूत सुविधाही अजून पोचलेल्या नाहीयेत. महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांच्या सीमेवर असलेले गाव आसंगी तुर्क. कविता आजही शिक्षण आणि प्रागतिक क्षेत्रापासून कोसो मैल दूर असणाऱ्या बंजारा समाजातील.

आई-वडील दोघेही विहीर खोदण्याचे काम करतात. आई रमाबाई (५५) अवघड अशा यारीच्या यंत्रावर काम करतात तर वडील भिमु राठोड (५८) खोलवर विहीर खणतात. भाऊही त्यांच्यासोबत कामावर जातो. या कुटुंबाने कष्टाची कामे करत कविता हिला शिकवले.

कविताचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद शाळेत झाले. ८ वी ते १० वी शाळा कधी बौद्ध विहाराच्या कोपऱ्यात तर काहीवेळा पडक्या घरात भरणाऱ्या शाळेत झाले. आठवड्यात एकदा विद्यार्थीच तिथली जमीन शेणाने सारवून काढत.

संत सद्गुरू भीमदास महाराज करांडे विद्यामंदिर ही ती शाळा. नंतर ११-१२वी साठी १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या संख येथील राजारामबापू पाटील शाळेत सायकलवरून गेली. विज्ञान विषय असणारी एकमेव मुलगी.

बारावीत सकाळी क्लासेस असायचे त्यामुळे पहाटे ४ वाजता उठून सायकलवरून तेरा किलोमीटर प्रवास करून जावे लागायचे. ७० टक्के गुण मिळाले. विज्ञान शाखेतच शिकण्याची इच्छा होती, पण वेळेत प्रक्रिया न समजल्याने प्रवेश घेता आला नाही.

घरी थांबल्या असत्या तर वर्ष वाया जाण्याच्या भीतीने नाईलाजास्तव बीएला प्रवेश घेतला. विटा येथे बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात प्रवेश मिळाला, पण कॉलेजला पलूसला आर्टस् कॉमर्स कॉलेजला जावे लागले. तिथे शिकत असताना इस्लामपूरच्या अस्लम शिकलगार यांच्या महाराष्ट्र अकॅडेमीची माहिती मिळाली.

दरम्यानच्या काळात भाऊ बंडू आणि वडील यांनी मिळेल तिथून पैसे जमा केले आणि शिक्षणाचा खर्च भागवला. वडिलांनी तर सावकारी व्याजाने कर्ज काढून फी भरली. बंडू यांना एसटीत वाहक म्हणून नोकरीही मिळाली, पण तिथेही कर्ज काढल्याने हातात तुटपुंजा पगारच पडे. ही एकूण पाच भावंडे. त्यात तीन भाऊ, दोघी बहिणी. त्यामुळे संसाराचा गाडा चालवायला कष्टाशिवाय पर्यायच नाही.

कविता हिने महाराष्ट्र अकॅडेमीत बारा ते चौदा तास अभ्यास केला. अस्लम शिकलगार यांनी प्रेरणा दिली. सतत आरोग्याच्या तक्रारी होत्या. तरीही घरातील सदस्य समजून सांभाळून घेतले. कोरोनाकाळात सगळे विद्यार्थी आपापल्या गावी, घरी गेलेले.

पण कविताला जाता आले नाही. आईवडील विहीर खोदण्याच्या कामासाठी कोकणात होते. जिल्हाबंदीमुळे ते तिकडे आणि या इकडे. या भीतीदायक काळात खूप खच्चीकरण झाले. पण इथेच खरी परीक्षा होती.

जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला देऊन आता माघार घ्यायची नाही आणि शासकीय नोकरी मिळवायचीच असा चंग बांधला. झटून अभ्यास केला. नेमका त्याचाच फायदा या परीक्षेत झाला. एकाचवेळी दोन पदे मिळाली.

कधी काळी कविता यांच्या या प्रवासकडे संशयाने पाहणारे, ती कधी यशस्वी होणार याबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना तिने चांगलेच उत्तर दिले आहे. कविता यांच्या निवडीनंतर बंजारा समाजातील लोक, ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. गावातून मिरवणूक काढून त्यांनी आनंद साजरा केला.

'यापुढच्या काळात समाजातील मागासलेपण आणि अज्ञान दूर करण्यासाठी आग्रही राहीन', अशी भूमिका तिने दैनिक 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

"लॉकडाऊन काळात कोरोनाची साथ आता लवकर जाणार नाही या चर्चेने नैराश्य आलेले. पण आईवडील घेत असलेले कष्ट पाहून अंतःप्रेरणा जागी व्हायची. इतक्या वयातही पहाटे चार वाजता उठून आईवडील इतकी कष्टाची कामे करतात, तर आपण अभ्यास का नाही करू शकत? असे नेहमी वाटायचे. आणि इतक्या कष्टातून बहीण-भाऊही आपणाला सपोर्ट करतायत हे पाहून प्रेरणा मिळायची. यातूनच यश मिळवू शकले."

- कविता राठोड, आसंगी तुर्क (ता. जत)

"ग्रामीण विद्यार्थी प्रशासनाचा कणा बनावा हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र अकॅडमी कार्यरत आहे. आजवर अनेक विद्यार्थी या प्रेरणेतून घडले आहेत. कविता राठोड सारख्या विद्यार्थ्यांनी ते ब्रीद सार्थ ठरवले आहे. अशा व्यक्ती उभ्या राहिल्या की आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते."

- अस्लम सुतार-शिकलगार संस्थापक सचिव, महाराष्ट्र अकॅडमी, इस्लामपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT