गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर आणि तालुक्याच्यादृष्टीने जुलैअखेर आणि ऑगस्ट महिन्यातच कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढल्याचे चित्र आहे. रुग्णाच्या संपर्कातील अधिकाधिक लोकांचे "कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' करून त्यांचे विलगीकरण प्रक्रिया पूर्ण केल्यास संसर्ग नियंत्रणात आणता येतो. जिल्ह्यात सरासरी हे प्रमाण पाच ते सहा इतकेच असले तरी गडहिंग्लज तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला मात्र एका बाधितामागे 13 जणांचा शोध घेण्यात यश मिळाले आहे. परिणामी, इतर तालुक्यांच्या तुलनेत गडहिंग्लजमधील संसर्ग कमी असल्याचे चित्र आहे.
राज्य शासनाच्या प्रोटोकॉलनुसार एका बाधिताच्या प्रथम, द्वितीय व तृतीय संपर्कातील किमान 15 ते 20 लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होणे अपेक्षित आहे. गडहिंग्लज तालुक्यातील आरोग्य यंत्रणा, दक्षता समित्यांनी या प्रोटोकॉलला टार्गेट करून वाटचाल सुरू ठेवल्याने सध्या एका रुग्णामागे सरासरी 13 लोकांना शोधण्यात यश मिळाले आहे. ही संख्या प्रोटोकॉल संख्येच्या जवळच आहे. या लोकांचे तत्काळ संस्थात्मक व गृह अलगीकरण केल्याने समूह संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले.
सध्या, वाढत्या रुग्णांच्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची संख्या वाढणे अपेक्षित असली तरी काही रुग्ण माहिती लपवित असल्याने संपर्कातील लोक शोधण्यात यंत्रणेसमोर आव्हानाचे ठरत आहे. विशेष करून शहरातील रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांचा शोध घेणे कठीण जात असल्याचे सांगण्यात येते. शहरामध्ये आणखी प्रयत्न वाढवल्यास प्रोटोकॉलप्रमाणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चेस करणे सहज शक्य आहे.
दरम्यान, तहसीलदारांनी आदेश काढून शहर आणि तालुक्यातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील सरासरी भयावह असली तरी गडहिंग्लज तालुक्यात मात्र याबाबत दिलासादायक चित्र समोर आले आहे. सुरवातीला ग्राम आणि प्रभाग दक्षता समित्या अतिशय अलर्ट होते. एका बाधिताच्या संपर्कातील किमान 15 ते 20 लोकांना संस्थात्मक किंवा गृह अलगीकरणात ठेवायचे.
मध्यंतरी रुग्ण संख्या कमी झाल्याने दक्षता समित्या शिथिल झाल्या. त्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये तिपटीने संसर्ग वाढला. परंतु, त्याप्रमाणात दक्षता समित्या सज्ज झाल्या नाहीत. परिणामी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये अडथळे येत आहेत. त्यातच रुग्ण माहिती लपवत आहेत. इतर तालुक्यांच्या तुलनेत गडहिंग्लजची परिस्थिती सकारात्मक असली तरी अजूनही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढणे अपेक्षित असून त्यासाठी ग्राम व प्रभाग दक्षता समिती, आरोग्य यंत्रणेला चार्ज करावे लागेल.
"आरोग्य' ला सहकार्य करा
मुळात आरोग्य यंत्रणेत मनुष्यबळ कमी आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात अडथळे येत आहेत. संपर्कातील व्यक्तींच्या शोधात स्थानिक प्रशासन म्हणून तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलिसपाटील यांचे आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आल्याने तहसीलदार दिनेश पारगे यांनी आदेश काढून या घटकांनी संयुक्तरीत्या सहकार्य करण्याची सूचना केली आहे. तसे न झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचा इशाराही दिला आहे.
संपादन - सचिन चराटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.