बेळगाव - राज्यशासन व महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन करून मास्क न वापरता बेळगाव शहरात फिरणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे महापालिकेनेही कारवाईचा वेग वाढवला आहे. गेल्या १२ दिवसात महापालिकेने ९१७ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १ लाख ५ हजार १९० रुपये दंड वसूल केला आहे. ही कारवाई सुरूच ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
देशभरात लागू करण्यात आलेला लॉक डाउन शिथिल झाल्या नंतर कर्नाटकातही त्याची कार्यवाही झाली. लॉक डाउन शिथिल करताना कर्नाटक सरकारने काही नवे नियम लागू केले. त्यानुसार प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले. शिवाय रस्त्यावर थुंकण्यावर निर्बंध घालण्यात आले. १ मे पासून त्याची अमंलबजावणी सुरू करण्यात आली. बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ. एस बी बोमनहळ्ळी यांनीही याबाबतचा आदेश बजावला व दंडात्मक कारवाईचा इशारा दिला. प्रारंभी पोलीस खात्याने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. पण नंतर महापालिकेच्या आरोग्य व महसूल विभागाने कारवाई सुरू केली.
गेल्या आठवडाभरापासून बेळगाव शहरात काही औद्योगिक व व्यावसायिक आस्थापने सुरू करण्यात आली आहेत. शहरात नागरिकांची वर्दळ वाढली आहे. आशा स्थितीत मास्कचा वापर व शारीरिक अंतर हे नियम काटेकोर पाळण्याची सूचना देण्यात आली आहे. पण बेळगावकरांनी ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचे कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. मास्क घातले नाही किंवा रस्त्यावर थुंकले तर प्रत्येकी १०० रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. पण अनेकजण दंडाची रक्कम पूर्णपणे देत नाहीत असे महापालिका कर्मचारी सांगतात. तरीही महापालिकेकडे १ लाख रुपयांपेक्षा जास्त दंड जमा झाला आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर अद्याप पालिकेने कारवाई केलेली नाही. सध्या केवळ मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. राज्यात मास्क सक्ती वर्षभर असणार आहे. त्यामुळे ही कारवाई वर्षभर सुरू राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.