कोल्हापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे अनेकांची वेळापत्रके कोलमडली. यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांत अस्वस्थता पसरली. राज्यसेवा आयोगाच्या एप्रिल व मेमध्ये होणाऱ्या परीक्षा सप्टेंबरपासून घेण्याचे आयोगाने जाहीर केले. परीक्षेची तारीख जवळ आली असली आणि अनलॉक असले तरी अजून अभ्यासिका, मार्गदर्शन केंद्र, अभ्यास वर्ग सुरू झालेले नाहीत, हे लवकर सुरू व्हावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे.
लॉकडाउननंतर अभ्यासिकांना टाळे लागले, तसेच मेस, खाणावळीही बंद झाल्याने विद्यार्थ्यांनी गावाकडची वाट धरली. पाच महिने झाले तरी या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या अभ्यासिका अद्याप खुल्या नाहीत. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर झाला आहे. पुणे कोल्हापूर, औरंगाबाद या ठिकाणी तयारीसाठी विद्यार्थी राहतात; परंतु कोरोना काळात सर्वांना घरी परतावे लागले. सध्या घरी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके, तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत नसल्याने तयारीत अडचणी येत आहेत. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत शहर गाठलेल्या तरुणांनी गावाकडे परतून मिळेल ते काम स्वीकारल्याचीही उदाहरणे असून, तूर्तास तरी त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न लांबणीवर पडले आहे.
नियोजित वेळापत्रकाबाबत संभ्रम
राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा या उन्हाळ्यात होणार होत्या. परंतु, कोरोनामुळे परीक्षांचे सुधारित वेळापत्रक आयोगाने जाहीर केले आहे. अनुक्रमे सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये या परीक्षा होणार आहेत; परंतु कोरोनाच्या प्रभावाचा विचार करता परीक्षेच्या आयोजनाचा फेरआढावा घेण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निश्चित परीक्षा कधी होईल, यामुळेही विद्यार्थी संभ्रमात आहेत.
पदभरती कधी ?
अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या आयोगाचा सध्या अध्यक्ष आणि दोन सदस्यांतर्फे कारभार सांभाळला जातो. आयोगाच्या पदभरतीबाबतही दप्तरदिरंगाई होत आहे.
हेही वाचा- कला शिक्षकाने हंपी दगडामध्ये कोरली 2 ते 18 सेमीची शिल्पे, वाचा नेसरीच्या कलासक्त शिक्षकाची कहाणी -
इतर परीक्षाही रखडल्या...
महापोर्टल द्वारे होणारी सरळ सेवा भरती प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने आघाडी सरकारने यावर बंदी आणली. परंतु युतीच्या काळात 72000 पदाची नोकर भरती प्रक्रिया कशी व कधी राबवायची हे अजून स्पष्ट झालेले नाही. तसेच नुकतीच घोषित झाली दहा हजार जागांसाठी पोलीस भरती कार्यक्रम ही जाहीर करण्यात आला नाही. त्याचबरोबर पीएसआय परीक्षेची शारीरिक चाचणी व मुलाखतीचे वेळापत्रक ही थांबलेले आहे.
कोरोना महामारीच्या काळात गावाकडे परतल्याने परीक्षेच्या तयारीत अडचणी आल्या आहेत. परीक्षांचे वेळापत्रक कोलमडल्याने व स्थगित असलेली परीक्षा प्रक्रिया लवकर होत नसल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे. तरी ही प्रक्रिया लवकर पार पाडावी.
- सुशांत उपाध्ये, स्पर्धा परीक्षार्थी
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.