Extreme Political Struggle For Votes In Gadhinglaj Kolhapur Marathi News
Extreme Political Struggle For Votes In Gadhinglaj Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजला मतामतांसाठी टोकाचा राजकीय संघर्ष 

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गेले महिनाभर तालुक्‍यातील 50 गावातील राजकीय वातावरण तापले होते. आज मतदानाच्या निमित्ताने त्याने उच्चत्तम पातळी गाठल्याचे दिसले. मतामतासाठी टोकाचा संघर्ष पहायला मिळाला. दर दोन तासांनी मतदानाच्या टक्केवारीचा आलेख चढता राहिला. त्याच पद्धतीने मतदानाच्या संपणाऱ्या वेळेबरोबर इर्षाही वाढत होती. मोठ्या आणि संवेदनशील गावात त्याची प्रचिती अधिक आली. गावच्या सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच असली तरी मतदान शांततेत पार पडले. 

पश्‍चिम भागात सकाळी वेग 
गडहिंग्लज : तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील बेळगुंदी, इंचनाळ, ऐनापूर, हिरलगे, शिप्पूर तर्फ आजरा, लिंगनूर कसबा नूल या गावात सकाळच्या सत्रात मतदानाला वेग मिळाल्याचे दिसून आले. कामावर जाण्यापूर्वी मतदान करणाऱ्याला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या हिरलगेत तणावपूर्ण वातावरण होते. मतदान केंद्राच्या आवारात उमेदवारांनाही प्रतिबंध केला होता. सकाळी दहालाच दोन्ही आघाडीचे कार्यकर्ते गल्ली बोळात फिरून मतदार बाहेर काढत होते. ऐनापूरात चुरस असली तरी शांततेत मतदान सुरू होते. इंचनाळमध्ये दोन्ही पॅनेलनी लावलेला जोर मतदानापर्यंतही काम होता. मतदाराला शेवटच्या क्षणापर्यंत चिन्हाची आठवण करून देताना उमेदवार आढळले. बेळगुंदी गाव छोटे असले तरी इर्षा प्रचंड दिसून आली. मतदान करुन घेण्यात युवक आघाडीवर होते. 

बुथवर गर्दी, केंद्रात शांतता 
हलकर्णी : गडहिंग्लज तालुक्‍याच्या पूर्व भागातील नूल, बसर्गे, खणदाळ, हलकर्णी, तेरणी, नरेवाडीसह चन्नेकुप्पी येथे सकाळच्या टप्प्यात केवळ बुथवरच गर्दी दिसली, मतदान केंद्रावर मात्र शांतता होती. जनावरांचा चारा आणि शेतीची किरकोळ कामे आवरून लोक मतदानासाठी येत होते. त्यांना आणण्यासाठी कार्यकर्त्यांचा अटापिटा सुरू होता. बारानंतर हळूहळू मतदानासाठी रांगा लागत होत्या. दुपारी चारनंतर मतदारांच्या गर्दीत भर पडत होती. खणदाळला प्रभाग दोनमध्ये एकमेकांच्या विरोधातील दोन पॅनेलप्रमुख उमेदवार असल्याने या केंद्रावर मोठी गर्दी होती. याचठिकाणी चुरस पहायला मिळाली. ऍड. श्रीपतराव शिंदे यांच्या गावात नूलमध्येही बुथवर प्रचंड गर्दी होती. संवेदनशील गाव असल्याने याठिकाणी पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्यासह कोल्हापूर पोलिसांचे राखीव दल दाखल झाले होते. खणदाळ येथेही राखीव दल दिवसभर थांबून होते. हलकर्णीत दोन आघाड्यांतील चुरशीमुळे कार्यकर्त्यांत इर्षा दिसली. तेरणी येथे तिरंगी लढतीमुळे मतदारांना आणण्यात मोठी इर्षा होती. गटागटाने मतदार येत होते. 


नेसरी परिसरात शांततेत मतदान 
नेसरी : नेसरी परिसरातील तळेवाडी, कानडेवाडी, वाघराळी, हेब्बाळ-जलद्याळ गावामध्ये शांततेत मतदान झाले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्रावर आरोग्य विभागाने मास्क, सॅनिटाझर, थ्रमल स्कॅन मशीन यांची व्यवस्था केली होती. केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केले गेले. सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर गर्दी कमी होती. अकरानंतर मतदारांची संख्या वाढू लागली. मतदार केंद्राबाहेर उमेदवार, गटप्रमुख मतदारांना मतदान करण्यासाठी सूचित करत होते. कुटुंबातील लोक एकत्र मतदानाला येताना दिसून आले. तळेवाडी, वाघराळी, हेब्बाळ-जलद्याळमध्ये अधिक चुरस होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात होता. 

फेटे बांधून गठ्ठा मतदान 
नूल : जरळी येथे मतदानात मोठी चुरस दिसली. चौगुले गल्लीतील मतदार फेटे बांधून केंद्रावर आले होते. सर्वांनी एकगठ्ठा मतदान केले. दुंडगे येथे उमेदवार मतदान केंद्रात गेल्याच्या कारणावरून वादावादीचा प्रसंग घडला. दोन्ही गट समोरासमोर आले होते. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करीत वातावरण शांत केले. माद्याळ कसबा नूल, हसुरचंपू, हेब्बाळ कसबा नूल, निलजी, मुत्नाळ या गावातही चुरशीने मतदान झाले. सकाळी नऊपर्यंत मतदानला जोर नव्हता. अकरा ते एक या कालावधीत केंद्रावर रांगा लागल्या होत्या. मतदारांना केंद्रावर आणण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर केला जात होता. वृद्ध मतदारांचे मतदान करुन घेण्यावर भर दिला जात होता. 

हरळी, हुनगिनहाळमध्ये शांततेत मतदान 
महागाव : हरळी बुद्रूक, हुनगिनहाळ व उंबरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाले. सकाळी नऊ ते बारापर्यंत मतदारांनी गर्दी केली होती. दुपारी दोनपर्यंत 60 टक्के मतदान झाले होते. उंबरवाडीत नऊ जागेसाठी बावीस उमेदवार रिंगणात आहेत. हरळी बुद्रूकमध्ये आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर एका जागेसाठी तिघेजण निवडणूक रिंगणात आहेत. हुनगिनहाळमध्ये सात जागेसाठी अठरा उमेदवार आहेत. मतदान केंद्राबाहेर पोलिस बंदोबस्त होता. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता योग्य शारीरिक अंतर ठेवून मतदानाच्या रांगा लावल्या होता. मतदान केंद्राबाहेर आरोग्य विभागाचे पथक थांबून होते. 

कोरोना इफेक्‍ट... 
कोरोना कालावधीत क्वारंटाईनच्या मुद्यावरून अनेक चाकरमानी आपापल्या गावाकडे येत होते. त्यावेळी त्यांना मिळालेल्या वागणुकीचा इफेक्‍ट ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला. अनेक गावात मतदानाला येण्यास चाकरमानी निरूत्साही राहिले. तेरणीसह काही गावात मुंबईकरसुद्धा रिंगणात उतरले आहेत. कोरोना कालावधीतील चाकरमान्यांना नकारात्मक दृष्टीकोनातून दिलेली वागणूक काही गावपुढाऱ्यांना महागात पडल्याची चर्चा आज मतदानादिवशी होती. 

नक्की टाकलंस न्हवं..! 
बसर्गे येथे एक दिव्यांग मतदार तीनचाकी सायकलीवरून मतदान केंद्रात पोहचला. त्यावेळी एका उमेदवाराने त्याला मतदान टाकलंस न्हव...अशी विचारणा केली. त्यावर या मतदाराने टाकलं की...असं उत्तर दिलं. तरीसुद्धा त्या उमेदवाराने पुन्हा नक्की टाकलंस न्हवं...असा अविश्‍वासाचा सूर काढल्यानंतर दिव्यांग मतदाराने आगा टाकलं की...किती वेळा सांगू...अशा काहीशा संतप्त भावनेने प्रत्युत्तर दिल्यानंतर उमेदवार शांत झाला. 

नेतं कुठं दिसनात... 
तालुक्‍यातील एका गावात मतदान केंद्राबाहेर दोघे बुजुर्ग बसले होते. त्यांच्यात निवडणुकीच्या संदर्भानेच गप्पा सुरु होत्या. त्यातील एकाने प्रश्‍न केला,""तालुक्‍याचं नेतं कुठं दिसनात गा. प्रचारातबी नव्हतं आणि आजबी फिरकायला नाहीत.'' त्यावर दुसऱ्या व्यक्तीने "ही निवडणूक गावची हाय. सगळ्यासनी सांभाळायला लागतया त्यांना' असे सांगत आपल्या सहकाऱ्याची शंका दूर केली. 

असे झाले मतदान... 
- 7:30 ते 9:30 ............ 10.94 टक्के 
- 11:30 पर्यंत................. 28.47 टक्के 
- 01:30 पर्यंत................. 50.42 टक्के 
- 03.30 पर्यंत................. 68.06 टक्के 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT