कोल्हापूर : "आमची हातावरची पोटं. दिवसभराच्या कमाईतूनच रात्री चूल पेटते. कुणी प्लास्टिक गोळा करतात. कोण भंगार, तर कुणी मासेमारी करतात. लॉकडाउन जाहीर झाले आणि साऱ्यांच्याच पोटाचा प्रश्न निर्माण झाला. आठ-दहा दिवस कसेतरी गेले. त्यानंतर मात्र मग पोटातली कालवाकालव गप्प बसू देईना. अखेर आमच्यातल्याच पोरांनी मग बाया-बापड्यांचे व्हिडिओ तयार केले आणि ते समाजाच्या ग्रुपवर शेअर करून मदतीचे आवाहन केले.''
भटके गोसावी समाजातील तरुण पोरं सांगत असतात आणि त्यातून या एकूणच समाजाची बिकट अवस्था उलगडत जाते.
लॉकडाउनचा फटका तसा सर्वच समाजघटकांना कमी-अधिक प्रमाणात बसला; पण गोसावी समाजाची अवस्था फारच वाईट. या काळात या समाजातल्या बाया गावात दिसल्या तरी त्यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले आणि त्याचमुळे मग चाळीस दिवसांहून अधिक काळ त्यांना घरीच थांबावे लागले आहे. मात्र, ही सक्तीची विश्रांती असली तरी त्याला विश्रांती तरी कसली म्हणायची? स्वतःच्या पोटाचं सोडाच घरातल्या पोराटारांच्या पोटाची भूक कशी भागवायची, हाच मोठा प्रश्न. शासनाने व समाजातील काही सेवाभावी संस्थांकडून मदत मिळाली; पण ती सर्वच ठिकाणी पोचलीच असे नाही. त्यामुळे अजूनही काही ठिकाणची कुटुंबं मदतीशिवाय दिवस काढत असल्याचे वास्तव आहे.
बदलत्या काळाबरोबर आता समाज हळूहळू बदलतो आहे. बालविवाहाची प्रथा तर समाजाने बंदच केली आहे. पारंपरिक व्यवसायाच्या चौकटी मोडून विविध क्षेत्रांत हातपाय हलवू लागला आहे. मात्र, अजूनही पूर्णपणे बदलायला काही वर्षे जातील, अशीच स्थिती आहे.
दृष्टिक्षेपात समाज...
- जिल्ह्यात पंधरा हजारांवर लोकसंख्या.
- शाहूवाडी, करवीर, कागल, हातकणंगले,
शिरोळ, पन्हाळा तालुक्यात सर्वाधिक.
- भंगार, कचरा, केसावर फुगे, स्क्रॅपवर
विविध वस्तूंची विक्री, मासेमारीसह इतर कामेही.
- दहा ते पंधरा टक्के समाजबांधव
कामाच्या निमित्ताने परगावी.
गोसावी समाज हा तसा अजूनही उपेक्षितच आहे. आमची पोरं आता कुठे शिकून विविध क्षेत्रांत आपले अस्तित्व निर्माण करू लागली आहेत. मात्र, महापुरानंतर आता कोरोनासारख्या संकटामुळे समाज पुन्हा हतबल झाला आहे. अजूनही समाजाचा गाडा सुरळीत होण्यास नक्कीच वेळ लागणार आहे.
- संदीप जाधव, गोसावी, रजपूतवाडी
मदतीसाठी व्हिडिओ शेअर केल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी व सेवाभावी संस्थांकडून काही अंशी मदत मिळाली. लॉकडाउनमध्ये आता शिथिलता मिळाली असली तरी एकूणच परिस्थिती पहाता 17 मेपर्यंत तरी घराबाहेर पडणे म्हणजे अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
- किशोर पडियार, शिरोळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.