कोल्हापूर : ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्याला उमेदवारी, कारण या निवडणुकीचे कार्यक्षेत्र मोठे, मग पळणार कोण? असा या मागचा दृष्टिकोन; पण त्याचवेळी "गोकुळ', जिल्हा बॅंक, जिल्हा परिषदेची निवडणूक आली की कार्यकर्ता राहतो बाजूला आणि राजकीय पुढाऱ्यांचे वारसदारच पुढे येतात. आताही राबणारा कार्यकर्ता बाजूला आणि वारसदारांच्या उमेदवारीसाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे सध्याच्या "गोकुळ' निवडणुकीसाठीच्या हालचालींवरून दिसते.
जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक, "गोकुळ' यांसारख्या संस्थांकडे दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची सोय म्हणून पाहिले जाते; पण आजपर्यंतचा जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर अशा मोक्याच्या ठिकाणी नेत्यांनी मुलाला, पत्नीला किंवा घरातील नातेवाइकांना संधी दिल्याचा इतिहास आहे. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी सुरू केलेल्या महालक्ष्मी दूध संघात तर सुरवातीला जिल्हा बॅंकेचे संचालक, जिल्हा परिषद सदस्यांना संचालक म्हणून संधी दिली; पण नंतर मात्र नेत्यांना कार्यकर्त्यांची आठवण झाली. अशीच स्थिती शाहू आणि मोरणा दूध संघात राहिली.
पाच वर्षांपूर्वी झालेल्या "गोकुळ'च्या निवडणुकीत विरोधी आघाडीने अपवाद सोडला तर सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली; पण त्या वेळी विजयाची खात्री नव्हती. आता झाडून सारे जिल्ह्यातील नेते एकत्र आल्याने प्रत्येकाला आपल्या घरातीलच कोण तर उमेदवार हवा, असे वाटू लागले आहे. गेल्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी किशोर पाटील या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली. या वेळी मात्र ते बंधू अजित नरके यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर गेली पाच वर्षे "गोकुळ' विरुद्धची लढाई सत्ताधाऱ्यांविरोधात लढत आहेत; पण त्यांचा विचार उमेदवारी देताना होईल का नाही, याविषयी शंका आहे. कारण आताच संभाव्य पॅनेलवर नजर टाकली तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार के. पी. पाटील, "राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील अशा मातब्बर नेत्यांचे वारसदारच उमेदवारीचे प्रबळ दावेदार असल्याचे दिसते.
विरोधी आघाडीसारखीच स्थिती सत्ताधाऱ्यांची आहे. सत्ताधाऱ्यांनी वर्षानुवर्षे असलेले चेहरेच लोकांसमोर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी निवृत्ती जाहीर केली असली तरी पुत्र चेतन यांच्यासाठी त्यांनी ताकद लावली आहे. आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, संजय घाटगे, सत्यजित पाटील यांचे वारसदारही उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत, किंबहुना त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे. मग सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त राबायचेच का, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
लोकांचा घराणेशाहीला विरोधच
वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या घराणेशाहीला सामान्य लोकांचाही तीव्र विरोध असल्याचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पाहायला मिळाले आहे. त्यातूनच नावीद मुश्रीफ, वीरेंद्र मंडलिक, रणजित के. पाटील, माजी आमदार (कै.) नरसिंगराव पाटील यांचे पुत्र महेश, माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या स्नुषा ज्योती, संग्रामसिंह कुपेकर, अजित नरके, संदीप नरके अशांना लोकांनी नाकारले आहे.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.