गडहिंग्लज (कोल्हापूर) : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल आणि त्याची छाननी प्रक्रिया संपली. आता वेध लागलेत ते माघारीचे. विजयासाठी अडचण ठरणाऱ्या उमेदवारांना रात्रीचा दिवस करून गळ घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ऐकलेच नाही, तर प्रेशर पॉलिटिक्सची स्ट्रॅटेजी वापरण्याच्या हालचालीही सुरू होतील. संबंधिताची कुठे-कुठे अडवणूक करता येते, याची फिल्डिंग लावली जाण्याची शक्यता आहे. यामुळे दबावाच्या राजकारणात कोणाकोणाचा बळी जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
गावगाड्याच्या राजकारणाचे खरे धूमशान सोमवारनंतर ( ४) सुरू होणार आहे. निवडणुकीतील महत्त्वाचा भाग मानल्या जाणाऱ्या माघारीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. पॅनेलमध्ये स्थान मिळण्यात अडचण वाटत असलेले अनेक इच्छुक अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याच्या भूमिकेत आहेत. अशांचे अर्ज मोठ्या प्रमाणात आहेत. गावपातळीवरील एकमेकांतील ईर्षा, भाऊबंदकी, राजकीय गटबाजी खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत निवडणुकीतून पुन्हा चव्हाट्यावर येते. इतक्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्यामागचे प्रमुख कारणही हेच असते.
अनेक ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोधची चर्चा सुरू झाली आहे. माघारीपर्यंत त्याला कितपत यश येते, हे आता सोमवारीच कळणार आहे. जेथे निवडणुका होणार आहेत, त्या ठिकाणी आता कुणी-कुणी माघार घ्यायची, या मुद्यावर घमासान सुरू झाले आहे. आघाडीच्या रचनांना वेग येणार आहे. ज्या ठिकाणी पॅनेलच्या उमेदवाराच्या विजयात अडचण येते, तेथील अपक्ष किंवा आपल्या व्यक्तीला माघार घेण्यासाठी गळ घालण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे.
विरोधातील एकमेकांच्या आघाडीतील उमेदवारांनाही दबावतंत्राचा वापर करून अर्ज माघारीसाठी फिल्डिंग लावण्याची शक्यता आहे. त्यासाठी संबंधिताच्या नेत्याकडून, नातेवाईक किंवा पाहुणे, मित्रमंडळींकडून निरोप पाठविले जाणार आहेत. ऐकलेच नाही, तर त्या व्यक्तीची कुठे अडवणूक करता येईल, त्यासाठी साम, दाम, दंड भेदाचा वापर करण्यात येणार आहे.
हेही वाचा- दुचाकी दुरुस्तीतीतून करिअरची इंजिन मजबूत : कोल्हापूरच्या शिवानीचे आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल
बंडखोरी थोपवण्याचे आव्हान
आघाडीत स्थान न मिळाल्यास अनेक इच्छुक बंडाच्या पवित्र्यात आहेत. त्यांची समजूत काढून बंडखोरी थोपविणे इतके सोपे राहणार नाही. त्यासाठी नेत्यांसमोर त्याला नेऊन त्याच्या पुनर्वसनासाठी शब्द घेणे, वारसाला कुठे तरी नोकरीला लावण्याचा शब्द घेणे किंवा आर्थिक आमिष दाखविण्याचे उद्योगही वाढणार आहेत. एकाच आघाडीतील इच्छुकाला शांत बसवून त्याची बंडखोरी टाळणे गावपुढाऱ्यांना आव्हानाचे ठरणार आहे. फटका बसण्याच्या शक्यतेने बंडखोरी थोपवण्यासाठी सर्व प्रकारच्या क्लृप्त्या लढविल्या जात असल्या, तरी त्याला कितपत यश येते, हे माघारीदिवशी कळेल.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.