कोल्हापूर : महापालिकेने कितीही, काहीही नियोजन केले, तरीही लक्ष्मीपुरी बाजारातील गर्दी काही केल्या हटायला तयार नाही. दररोज लक्ष्मीपुरीत गर्दी होतच आहे. त्यामुळे प्रशासनाने आता या गर्दीसमोरच हात टेकले असून यासंदर्भात कठोर निर्णय घेतल्याशिवाय प्रशासनासमोर पर्याय नसल्याचे स्पष्ट होत आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउनशिवाय पर्याय नाही. लॉकडाउनमधून जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेला भाजीपाला, धान्य, किराणा माल आणि औषध दुकाने यांना वगळण्यात आले आहे. पण यापैकी भाजी मंडईत सामाजिक अंतर ठेवण्याचा नियम पायदळी तुडविला जात आहे. अगदी पहिल्या दिवसापासून याबाबतीत अनेक नियम करण्यात आले. मंडईतून भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर आणण्यात आले. रस्त्यावरून मैदानात आणि मैदानातून पुन्हा रस्त्यावर आणले. तरीदेखील कोणत्याही नियमाचे येथे पालनहोताना दिसत नाही.
विशेषतः लक्ष्मीपुरी भाजी मंडईत दररोज गर्दी होते. येथून फेरफटका मारल्यानंतर लॉकडाउन येथे आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष्मीपुरीतील मंडई पूर्णपणे बंद करून ही मंडई लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे ते फोर्ड कॉर्नर ते रिलायन्स मॉल येथे बसविण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक विक्रेत्याने किमान 50 फूट अंतरावर बसावे, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असेही अनेकदा बजावण्यात आले. पण भाजी विक्रेते आणि ग्राहकांकडूनही येथे नियमांचे पालन होत नाही. लक्ष्मीपुरीत ये-जा करणारी वाहने, मालवाहतूक रिक्षा, नागरिकांच्या दुचाकी, चारचाकी यांसह नागरिकांचीही गर्दी होत असल्याने आता करायचे तरी काय, असा प्रश्न प्रशासनाला पडला असून, ही गर्दी हटली नाही तर मात्र थेट कठोर कारवाईच करण्याचा महापालिका प्रशासनाचा इरादा आहे.
ग्राहक, विक्रेत्यांना नाही गांभीर्य
दोनच दिवसांपूर्वी यासंदर्भात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात महापालिका, विक्रेते, पोलिस अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन पुन्हा नवे नियोजन करण्यात आले. या नव्या नियोजनानुसार लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार आणि मिरची बाजार एक दिवसआड सम-विषम तारखेनुसार सुरू ठेवण्याचा निर्णय झाला. तर भाजीपाला मार्केट लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यापासून काही अंतर ते फोर्ड कॉर्नर असे नियोजन झाले. तसेच फळ विक्रेत्यांना फोर्ड कॉर्नरपासून कोंडा ओळीकडे गेलेल्या रस्त्यावर बसण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.