कोल्हापूर : इलेक्ट्रीकल वस्तू उत्पादक, फौंड्रीसाठी लागणारा कच्चा माल, हा मोठ्या प्रमाणात चीनवरून येतो. फेब्रुवारीपासून चीनसोबतचा व्यापार बंद आहे. देशातील लॉकडाउन संपला तरी चीनसोबतचा व्यापार लवकर सुरू होईलच असे नाही. कच्चामाल उपलब्ध झालाच नाही आणि ऑर्डर मिळालीच नाही तर उत्पादन कसे करायचे? असा प्रश्न फौंड्री व्यावसायिकांसमोर आहे. मुळात फौंड्री व्यवसायात फेब्रुवारीपासून मंदी होती. त्यात दोन महिन्यांचे लॉकडाऊन यामुळे जिल्ह्यातील फौंड्री उद्योगाची सुमारे 2 हजार कोटींची उलाढाल थांबली आहे.
कोल्हापूर औद्योगिक वसाहतीत फौंड्री उद्योगाचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय इलेक्ट्रीकल उप्तादने बनवणाऱ्याही काही कंपन्या आहेत.
वाहन उद्योगांना सेवा पुरवणारे छोटे उद्योगही आहेत. त्यांना लागणाऱ्या कच्च्या मालातील बहुतेक वस्तू चीनमधून आयात होतात.
चीनमध्ये कोरोना पेशंटची संख्या वाढायला लागली तसा चिनची आयात निर्यातही थांबवली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून हा व्यापार थांबला. त्याचा फटका देशातील सर्वच उद्योगक्षेत्रांना बसला. कोल्हापुरातील फौंड्री आणि इलेक्ट्रीकल उत्पादन निर्मिती उद्योगाला मात्र याचा मोठा फटका बसला. ज्यांच्या जवळ कच्च्यामालाचा साठा आहे, ते उत्पादन सुरू करतील. पण ज्यांच्याकडे नाही, त्यांना मात्र उद्योग बंद ठेवावा लागेल. साठा असणाऱ्यांनाही हा फार काळ उत्पादन सुरू ठेवता येणार नाही. चीनमध्येही काही महिन्यांसाठी उद्योग बंद होते. त्यामुळे तेथील उत्पादन थांबले आहे. याचाही परिणाम कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर होणार आहे.
चीनमधून येणारा कच्चा माल
* फौंड्री उद्योग - पीग आयर्न, सिलिका, मॅंग्नीज, कास्टिंगचे साहित्य, विविध प्रकारचे केमिकल्स आदी
* इलेक्ट्रीकल उद्योग - इलेक्ट्रीक कपॅसिटर, लायटनींग अरेस्टर, सर्कीट ब्रेकर्स, करंट ट्रान्सफार्मर, हाय व्होल्टेज कपॅसिटर.
फौंड्री उद्योगावर अनेक छोटे उद्योग अवलंबून आहेत. फौंड्रीला विविध साहित्य पुरवठा करणारे व्यवसायही यावर अवलंबून आहे. त्यामुळे या उद्योगात मंदी आली, की त्याचा परिणाम कोल्हापुरच्या अर्थकारणावर होतो. भविष्यात कामगारांचे पगार, भांडवली खर्च आणि नफा यांचा मेळ घालण्याचे आव्हान फौंड्री उद्योजकांसमोर आहे.
- रविकुमार केळगीनमठ, सीएमडी, केलसन ग्रुप.
फौंड्रीसाठी लागणारा कच्चा माल चीनवरून येतो. फेब्रुवारीपर्यंत मालाचा पुरवठा झाला. पण त्यानंतर थांबला. ज्यांच्याकडे साठा आहे ते लॉकडाउननंतर उत्पादन करू शकतील. पण बाकीच्यांना कच्च्या माल उपलब्ध करावा लागेल. वर्षभरापासून फौंड्री व्यावसायिक अडचणीत असून आता ही नवी समस्या निर्माण झाली आहे.
- डी. डी. पाटील,ज्येष्ठ फौंड्री व्यावसायिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.