कोल्हापूर

लाखो भाविकांचे कुलदैवत जोतिबाची आज चैत्र यात्रेचा सोहळा

निवास मोटे : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :दख्खनचा राजा श्री जोतिबा, सौदागर, जोतिर्लिंग, रवळनाथ, केदारलिंग या नावांची बिरुदे भक्तांनी त्याला अर्पण केलीत असा देवाधिदेव वाडी रत्नागिरीचा जोतिबा म्हणजे केदारलिंग होय. कोल्हापूरच्या वायव्येस अठरा किलोमीटरवर जोतिबा डोंगर म्हणजे वाडी रत्नागिरीचे जोतिबा देवस्थान प्रसिद्ध आहे. सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे. त्याला पुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेला आहे तोच जोतिबाचा डोंगर होय. प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले जोतिबाचे पुरातन मंदिर या ठिकाणी आहे.

समुद्रसपाटीपासून 3100 फूट उंचीवरील जोतिबा डोंगराचा परिसर सौंदर्याने नटलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात, भौतिक व ऐतिहासिक ऐश्‍वर्यात मोलाची भर घालणारा या देवालयाचा परिसर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात या राज्यांतील लाखो भाविकांचे जोतिबा हे कुलदैवत आहे. डोंगरावरील उंच-सखल भागामध्ये वाडी रत्नागिरी गावठाण आहे. सहा हजार या गावची लोकसंख्या असून 90 टक्के लोक गुरव (पुजारी) समाजाचे आहेत. देवाचे धार्मिक कार्य, नारळ, गुलाल, खोबरे, मेवामिठाई, हॉटेल यावर त्यांची उपजीविका चालते.

दर वर्षी एप्रिल महिन्यात चैत्र पौर्णिमेला जोतिबा डोंगरावर विराट यात्रा भरते. राज्यातून सुमारे सहा-सात लाख भाविक या योत्रेसाठी येतात. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जोतिबा यात्रेचा प्रारंभ होतो. कामदा एकादशीस भाविक यात्रेसाठी येण्यास सुरुवात होते. गुढीपाडव्यास निगवे दुमाला (ता. करवीर) येथील हिंम्मतबहाद्दूर चव्हाण सरकार यांची मानाची सासनकाठी सदरेजवळ उभी करण्यात येते.

गुढीपाडव्यानंतर बेळगाव (कर्नाटक)चे भाविक पायी येण्यास प्रारंभ करतात. बेळगावमधील चव्हाच गल्ली व नार्वेकर गल्लीतील भाविक बैलगाड्या घेऊन पायी मोठ्या संख्येने येतात. ते कामदा एकादशीस जोतिबावर पोचतात. त्यांना मानाचा विडा देऊन स्वागत करण्यात येते. हे भाविक तंबू मारून डोंगरावर राहतात. पायी येण्याची या भाविकांची पिढ्या अन्‌ पिढ्यांची परंपरा आहे. जोतिबावर मानाच्या 96 सासनकाठ्या असून त्या यात्रेत आदल्या दिवशी डोंगरावर येतात. "जोतिबाच्या नावानं चांगभलं'चा जयघोष करीत मंदिर परिसरात येतात. मुख्य मंदिराभोवती प्रदक्षिणा काढून त्या मंदिराभोवती उभ्या केल्या जातात.

मानाच्या सासन काठ्यांचे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पानाचा विडा देऊन स्वागत करते. मुख्य चैत्र यात्रे दिवशी पहाटे श्रींना शासकीय महाभिषेक पन्हाळ्याच्या तहसीलदारांच्या प्रमुख हस्ते घालण्यात येतो. या वेळी विविध शासकीय अधिकारी, ग्रामस्थ, पुजारी उपस्थित असतात. त्यांच्याकडून श्रींची अलंकारीत सरदारी खडी महापूजा बांधली जाते.

दुपारी दीड वाजता कोल्हापूरचे पालक मंत्री, आमदार, खासदार यांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होतो. यासाठी सासनकाठ्या हलगी, पिपाणी, सनईंच्या सुरांवर नाचविल्या जातात. विविध गितांच्या चालींवर भाविक काठ्या घेऊन बेधुंदपणे नाचतात. या काठ्या तीस ते पन्नास फूट उंचीच्या असतात. बांबूच्या तळापासून चार-पाच फुटांवर एक आडवी फळी असते त्यावर जोतिबाचे वाहन घोडा बसविलेला असतो. विविधरंगी सासनकाठ्यांमुळे जोतिबा मंदिरास शोभा येते. चैत्र यात्रेनिमित्त हस्त नक्षत्रावर देवाची पालखी काढली जाते. त्यापूर्वी चांदीची पालखी आकर्षक फुलांनी सजवून त्यात श्रींची उत्सवमूर्ती ठेवली जाते. देवभावी तलावाजवळ तोफेची सलामी दिल्यानंतर पालखी मंदिरातून बाहेर येऊन ती यमाई मंदिराकडे जाण्यास निघते. यावेळी लाखो भाविक पालखीवर गुलाल-खोबऱ्याची उधळण करतात.

पालखी गजगतीने सायंकाळी सात-साडेसात वाजता श्री यमाई मंदिराकडे जाते. यमाई मंदिरात विविध धार्मिक विधी होतात. पालखी सोहळा झाल्यावर भक्त आपापल्या गावी रवाना होतात. चैत्र यात्रेनंतर पाच रविवारी जी यात्रा भरते, त्या यात्रेस "पाकळणी' असे म्हणतात. ज्यांना चैत्र यात्रेस येण्यास मिळाले नाही, ते पाकळणीस येऊन पालखी व शिखरांवर गुलाल खोबरे टाकून दर्शन घेऊन परततात. दरम्यान, यात्रेत चार दिवस गायमुख तलाव या ठिकाणी कोल्हापुरातील सहज सेवा ट्रस्टचे अन्नछत्र असते. तसेच जोतिबा एस. टी. स्थानक परिसरात आर. के. मेहता चॅरिटेबलच्या वतीने मोफत अन्नछत्र असते. या अन्नछत्राच्या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांच्या झुंडीच्या झुंडी जातात. या अन्नक्षेत्रामुळे भाविकांचा आत्मा तृप्त होतो.

Edited By- Archana Banage

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup Final: भारतीय फलंदाजांची पाकिस्तानच्या माऱ्यासमोर शरणागती; पराभवासह विजेतेपदाचं स्वप्नही भंगलं

Sindkhed Raja Nagaradhyaksha Election : शरद पवारांचा २१ वर्षीय उमेदवार बनला नगराध्यक्ष, १५८ मतांनी विजयी; कोण आहे सौरभ तायडे?

Jalgaon Accident : जळगावात अपघातांचे सत्र! दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Navi Mumbai: नवी मुंबई ते नागपूर विमानसेवा सुरू होणार; कधीपासून अन् तिकीट दर काय असणार? जाणून घ्या...

Nashik News: रुग्णालयातूनच रणनिती आखली, आजारी असूनही राजकारणावर पकड केली; उमेदवाराला जिंकवून भुजबळांनी ताकद दाखवली!

SCROLL FOR NEXT