कोल्हापूर

जयश्री जाधवांचा मोठा विजय; कोल्हापुरात भाजपचा करेक्ट कार्यक्रम!

सकाळ डिजिटल टीम

‘आण्णांच्या माघारी, आम्ही घेतो जबाबदारी’ ही टॅगलाईन खरी झाली आहे.

कोल्हापूर - दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या श्रीमती जयश्री जाधव यांनी 96, 176 मते मिळवत दणदणीत विजय मिळविला. निवडणुकीतील ‘अण्णांच्या माघारी, आता आपली जबाबदारी’ ही टॅगलाईन खरी करीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सत्यजित कदम यांना 77,424 मते मिळाली आहेत. पालकमंत्री सतेज पाटील ‘किंगमेकर’ ठरले. निकालानंतर महाविकास आघाडीचे समर्थक व कार्यकर्त्‍यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली.

या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. १२) चुरशीने ६१.१९ टक्के मतदान झाले होते. एकूण दोन लाख ९१ हजार ९७८ मतदारांपैकी एक लाख ७८ हजार ५४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदामात आज सकाळी आठला मतमोजणी सुरू झाली. १५ टेबलवर २६ फेऱ्यांत ३५७ केंद्रांवरील मतमोजणी करण्यात आली.

पहिल्यापासूनच मतांची आघाडी घेतलेल्या श्रीमती जाधव यांनी मधल्या तीन-चार फेऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील एक-दोन फेऱ्यांचा अपवाद वगळता शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले.

पालकमंत्री सतेज पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आणि आरोप-प्रत्यारोपांच्या तोफांनी राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या या निवडणुकीत श्रीमती जाधव यांनी विजय खेचून आणला आणि काँग्रेसचा गड राखला. पालकमंत्री पाटील यांनी या मतदारसंघावरील आपली पकड मजबूत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. कसबा बावड्यातील मतांकडे सर्वांचे लक्ष होते. तेथे पालकमंत्री पाटील यांचाच वरचष्मा दिसून आला.

भाजपच्या पराभवामुळे प्रदेशाध्यक्ष पाटील यांना मतदारांनी धक्का दिला. विकासापेक्षा वैयक्तिक टिकेला महत्त्व, त्यातून झडलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, रांगोळीवर ओतलेले पाणी, महिलांविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य, सभेवर झालेली दगडफेक अशा कोणत्याही मुद्यांचा परिणाम निकालावर झाला नसल्याचे स्पष्ट झाले. पालकमंत्री पाटील यांनी दिवसरात्र झोकून देत यंत्रणा राबवून काँग्रेसला विजयी केले.

बालेकिल्ल्यातच खिंडार

कदमवाडी, भोसलेवाडी हा परिसर श्री. कदम यांचा बालेकिल्ला आहे. लाईन बाजार प्रभागातून ते नगरसेवक बनले होते. कदमवाडी प्रभागाचेही ते सध्या प्रतिनिधित्‍व करीत होते. या बालेकिल्ल्यातच त्यांना मोठा धक्का बसला.

शहरातील पहिल्या महिला आमदार

श्रीमती जयश्री जाधव यांच्या रूपाने शहराला पहिल्या महिला आमदार मिळाल्या आहेत. यापूर्वी जिल्ह्यातील इतर मतदारसंघांतून श्रीमती संध्यादेवी कुपेकर, श्रीमती संजीवनीदेवी गायकवाड, (कै.) श्रीमती सरोजिनी खंजिरे यांनी आमदार म्हणून अनुक्रमे चंदगड, शाहूवाडी व शिरोळ मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व केले आहे.

दुसऱ्या नगरसेवक आमदार

जाधव यांच्या निवडीने महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलेल्या दुसऱ्या नगरसेवक शहराच्या आमदार झाल्या आहेत. यापूर्वी १९७८ च्या महापालिकेच्या सभागृहात (कै.) दिलीप देसाई नगरसेवक होते, त्यानंतर १९९० मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर शहराचे आमदार झाले. श्रीमती जाधव या मावळत्या सभागृहात भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यांचे पती (कै.) चंद्रकांत जाधव यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी घेतली आणि ते विजयी झाले. त्यांच्या निधनानंतर श्रीमती जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्या विजयी झाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: जोशुआ लिटिलच्या गोलंदाजीपुढे बेंगळुरूचे फलंदाज ढेपाळले; अर्धा संघ झाला बाद

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT