कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महापालिका निवडणूक राजकीय सामनाही अटीतटीचा होणार आहे. या निवडणुकीत रणनीती आखायला आतापासूनच सुरुवात केली आहे. यंदाच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे अंडरस्टॅंडिंग असणार आहे, तर शिवसेनेचा ‘एकला चलो रे’ हा नारा असणार आहे. भाजप आणि ताराराणी आघाडी दोन्ही काँग्रेसला टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महापालिकेची निवडणूक रंगतदार होणार आहे.
महापालिकेची निवडणूक यापूर्वी पक्षीय पातळीवर लढली जात नव्हती. याला शिवसेना मात्र अपवाद होती. शिवसेना नेहमीच पक्षीय पातळीवर निवडणूक लढली आहे, परंतु महापालिकेची सत्ता अपक्षांच्या मदतीने ताराराणी आघाडीने अनेक वर्षे आपल्याकडे खेचून आणली आहे. कित्येक वर्षे ताराराणी आघाडीचे वर्चस्व होते. २००५ ला प्रथमच जनसुराज्य राष्ट्रवादी आघाडीने ताराराणी आघाडीच्या विरोधात आघाडी उघडली.
त्यांनी आघाडीसमोर चांगले आव्हान निर्माण केले होते. त्यानंतर २०१० मध्ये झालेली महापालिकेची निवडणूक शंभर टक्के पक्षीय पातळीवर लढली गेली. यावेळी काँग्रेसचे सर्वाधिक ३३, राष्ट्रवादी काँग्रेसचे २५, जनसुराज्यचे ४, शिवसेनेचे ५, भाजपचे ३, शाहू आघाडीचा १ आणि अपक्ष ७ असे पक्षीय बलाबल होते. या निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व सतेज पाटील यांनी तर राष्ट्रवादीचे नेतृत्व हसन मुश्रीफ यांनी आपल्याकडे ठेवले. २०१५ मध्येही दोन्ही काँग्रेसनेच आपला वरचष्मा कायम ठेवला; पण भाजप-ताराराणी आघाडीनेही चांगले संख्याबळ निवडून आणले होते. भाजपच्या १३ तर ताराराणी आघाडीच्या १९ जागा निवडून
आल्या होत्या.
आता २०२० ची पंचवार्षिक निवडणूक येत्या काही महिन्यांत होणार आहे. कोरोनामुळे ही निवडणूक लांबणीवर पडली आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस या दोन्ही पक्षांचे अंडरस्टॅंडिंग असणार आहे. दोन्ही काँग्रेसनी ४५ प्लस राहण्यावर भर दिला आहे. शिवसेना आपली ताकद स्वतंत्रपणे पणाला लावणार आहे. यंदाच्या वेळी काहीही झाले तरीदेखील १५ पेक्षा जादा जागा निवडून आणण्याचे लक्ष्य शिवसेनेचे आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जाणार आहे. त्यामुळे हा पक्ष किती ताकद लावतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडीही या निवडणुकीत आव्हान निर्माण करणार आहे. महाडिक विरुद्ध सतेज पाटील यांच्यातील संघर्षाची किनार या निवडणुकीला असणार आहे. सामना पक्षीय असला तरीदेखील खरी लढत सतेज पाटील आणि महाडिक गटातच होणार आहे. या दोघांच्या राजकारणाभोवती महापालिकेचे राजकारण फिरणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक ही देखील लक्षवेधी ठरणार आहे.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.