कोल्हापूर : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "पन्हाळा ते पावनखिंड' पदभ्रमंती मोहीम रद्द करण्याचा निर्णय पन्हाळा ते पावनखिंड मध्यवर्ती समितीतर्फे घेण्यात आला. पावनखिंड परिसरात प्रतिकात्मक पद्धतीने पूजन करण्याचा विचार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी चर्चा करून तो निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मैत्रेय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांनी दिली. समितीतर्फे उद्यमनगरातील जायंटस सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
डॉ. अडके म्हणाले,""कोरोनाचे संकट अद्याप निवळलेले नाही. मोहिमवीरांच्या स्वास्थ्यासाठी यंदा मोहीम घेणे धोक्याचे ठरेल. त्यामुळे यंदाची मोहीम रद्द करत आहोत. इतिहास विषयक कार्य करणाऱ्या संस्थांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, परंपरा खंडित न करता प्रतिकात्मक पद्धतीने वीररत्न शिवा काशीद, नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा व पावनखिंड परिसरात पूजन करण्याचा विचार सुरू आहे. त्याबाबतची परवानगी घेण्यासाठी जिल्हाधिकारी देसाई यांच्याशी चर्चा करणार आहोत.''
सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत साळोखे यांनी दरवर्षी होणाऱ्या मोहिमेचा उद्देश सांगितला. नव्या पिढीला मोहिमेतून ऊर्जा मिळत असल्याचे सांगत यंदा दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा केला. त्यापद्धतीनेच यंदा पावनखिंड मोहीमेचा विचार करावा लागेल, असे सांगितले.
या प्रसंगी आनंदराव पोवार मर्दानी खेळ संस्थेचे अध्यक्ष पंडित पोवार, मावळा प्रतिष्ठानचे विनोद साळोखे, सह्याद्री प्रतिष्ठानचे सागर पाटील, अजिंक्य जाधव, गडकोट गिर्यारोहक संस्थेचे अध्यक्ष नितीन देवेकर, शिवशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव, योगेश रोकडे, रामदास पाटील, शिवराष्ट्र हायकर्सचे प्रशांत साळुंखे, कोल्हापूर हायकर्सचे सागर पाटील, गिरीभ्रमणचे प्रकाश मोरबाळे, व्हाईट आर्मीचे प्रशांत शेंडे, कोल्हापूर हायकर्सचे विजय ससे, मैत्रेय प्रतिष्ठानचे विश्वनाथ मगदूम उपस्थित होते.
दृष्टिक्षेप
- कोरोनामुळे मोहीम रद्द करण्याचा मध्यवर्ती समितीचा निर्णय
- पावनखिंड परिसरात प्रतिकात्मक पद्धतीने पूजन शक्य
- जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार
- मोजक्या मोहीमवीरांच्या उपस्थितीत मोहीम करण्याचा विचार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.