कोल्हापूर, ता. २६ : शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. वेळेत पगार न होणे, पगाराला भरमसाठ कात्री लावणे, कामाचा प्रचंड दबाव यामुळे हे कंत्राटी कर्मचारी जिवाचे बरेवाईट करून घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
जिल्हा परिषदेत एका कंपनीच्या माध्यमातून कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या सूरज शिंदे यांनीही अशाच कारणामुळे मृत्युला कवटाळले. मात्र असा विचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी नाही. राजकीय मंडळींनी उघडलेल्या कंत्राटी भरतीच्या धोरणाचे अनेक तरुण बळी पडत आहेत. त्यामुळे ठेक्यावर होणाऱ्या नोकर भरतीला व त्यातून होणाऱ्या पिळवणुकीला वेसन घालणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाच्या बहुतांश कार्यालयात ठेकेदारातर्फे कंत्राटी नोकर पुरवले जात आहेत. हे कर्मचारी संबंधित शासकीय कार्यालयात काम करत असले तरी त्यांना शासनाची कोणतीही सुरक्षा नाही. या ठेकेदारी तत्त्वावरील नोकर भरतीची व्याप्ती फार मोठी आहे. महसूल, सीपीआर व जिल्हा परिषद या ठिकाणी सर्वाधिक कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत.
जिल्हा परिषदेचा विचार करता डाटा एंट्री ऑपरेटरपासून वाहन चालकांपर्यंत व सफाई कर्मचाऱ्यांपासून सुरक्षा रक्षकापर्यंतची बहुतांश पदे हे ठेकेदारांमार्फत भरली आहेत. जिल्हा परिषदेचा असा एकही विभाग नाही जिथे कंत्राटी कर्मचारी कार्यरत नाहीत.
कंत्राटी कर्मचारी भरती आता ठेकेदारांतर्फे होऊ लागली आहे. काही ठेकेदार कंपन्या या थेट मंत्रालयातून निवडलेल्या आहेत. संस्था मुंबईत व कंत्राटी कर्मचारी कोल्हापुरातील गावागावांत अशी परिस्थिती आहे. तर काही कर्मचाऱ्यांचा पुरवठा जिल्ह्यातील कंपन्यांकडून करण्यात येत आहे. अपवाद वगळता एकही कंपनी या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार देत नाहीत.
चार, सहा, आठ महिने पगार न मिळणारे अनेक कर्मचारी आहेत. तसेच होणाऱ्या पगाराला मोठ्या प्रमाणात कात्रीही लावली जात आहे. साफसफाई कर्मचारी तर दर महिन्याच्या पगारासाठी यापूर्वी पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करत. आता तर सर्व कामकाज अधिकाऱ्यांकडे असल्याने तक्रार करायची कोणाकडे, पगाराची जबाबदारी घेणार कोण असा प्रश्न या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.