कोगनोळी - येथील राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोलनाक्यावर महाराष्ट्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येथून सीमाभागातील अनेक शेतकरी दुधगंगा नदीवर शेतीपाण्याच्या विद्युत मोटारी सुरु करण्यासाठी जातात. तसेच परिसरातील कित्येक रुग्ण कागल येथील खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी जातात. पण बंदोबस्तावरील महाराष्ट्र पोलिसांचा त्यांना ये-जा करताना त्रास होत असून या तपासणी नाक्यावरून सोडण्याची मागणी होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारलेला महाराष्ट्र पोलिसांचा हा सीमा तपासणी नाका महत्त्वाचा आहे. पण स्थानिक लोकांनाच कर्नाटकात जाण्यासाठी नोंद करावी लागत आहे. अनेकवेळा येथून सोडले जात नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. अत्यावश्यक सेवेतील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही नोंद करुन सोडले जात आहे. सीमाभागातील ८६५ गावातील नागरिकांची महाराष्ट्राशी नाळ जोडली आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांनी याचा विचार करुन कोगनोळी येथे सुरू असलेल्या सीमा तपासणी नाक्यावर कर्नाटक सीमाभागातील नागरिकांना मुभा मिळावी, अशी मागणी होत आहे.
तपासणी आधीच डॉक्टरांचे पत्र आणायचे कोठून ?
कर्नाटकातून कागल व कोल्हापूरला दवाखान्यास जाताना महाराष्ट्र पोलिसांकडून कोगनोळी तपासणी नाक्यावर डॉक्टरांच्या पत्राची मागणी केली जाते. आरोग्यविषयक तक्रारीमुळे तपासणीसाठी अचानक किंवा पहिल्यांदाच जाताना हे पत्र आणायचे कोठून ? असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.
'महाराष्ट्रातील आपले वरिष्ठ डीवायएसपी यांच्याशी चर्चा करून कर्नाटक पोलिसांकडून शेतकऱ्यांची यादी घेऊन त्यांना सोडण्यात येईल. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याबाबत पोलिसांना सूचना देण्यात येतील.'
- दत्तात्रय नाळे,
पोलिस निरीक्षक, कागल
'सीमाभागातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी येथील दूधगंगा नदीवर आहेत. त्याचप्रमाणे शेतीही या नदीच्या काठावर असल्याने शेतीकामासाठी जावे लागते. रासायनिक खते, किटकनाशके व अन्य खरेदीसाठी शेजारील कागलला जावे लागते. त्यामुळे सीमाभागातील शेतकरीवर्गाला नाक्यावरून जा-ये करण्यास परवानगी मिळावी.
- सुनील जगताप,
शेतकरी कोगनोळी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.