संस्थांपेक्षा पद ठरतेय महत्वाचे
मानसिकता वेदनादायी : ‘गोडसाखर’ पाठोपाठ अर्बन बँकेच्या निवडणूकीने होतेय चर्चा
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : हजारो कुटुंबांना आधार देणाऱ्या तालुक्यातील सहकारी संस्था विविध कारणांनी अडचणीत आल्या आहेत. तालुक्याच्या आर्थिक उलाढालीचे केंद्र असणाऱ्या या संस्था टिकाव्यात याचे कोणालाच देणेघेणे नसल्याचीच मानसिकता दिसत आहे.
गोडसाखर कारखाना पाठोपाठ येथील अर्बन बँकेची निवडणूकही लागल्याने ही मानसिकता वेदनादायी आहे. बिनविरोधचा सार्वत्रिक सुर असूनही केवळ राजकीय अस्तित्व व पदासाठी होणाऱ्या निवडणुकांमुळे अशा संस्था आणखीनच अडचणीत येण्याची भिती आहे. तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या अनेक संस्था चुकीच्या कारभारामुळे अलिकडे आर्थिक अडचणीत आल्या आहेत. शिवाजी बँक बंद आहे. गोडसाखर, कृषि उत्पन्न बाजार समिती, तालुका खरेदी विक्री संघ या संस्थाही आर्थिकदृष्ट्या तोट्यात आहेत. गडहिंग्लज अर्बन बँक चुकीच्या गुंतवणुकीने अडचणीत आहे. शेकडो कुटुबांच्या भाकरीची सोय या सहकारी संस्थांमुळे झाली आहे. परंतु, चुकीच्या कारभारामुळे संस्था अडचणीत आल्याने त्याचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसत आहे. गोडसाखर कारखाना यंदाही बंदच आहे. अडचणीतील या कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी असा सार्वत्रिक सूर होता. पण, याकडे डोळेझाक करत विक्रमी संख्येने अर्ज भरले गेले. नेत्यांनी कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी दंड थोपटले. हा कारखाना यंदाही बंदच राहिल्याने निवडणूकीने काय साधले, हाच प्रश्न ऊस उत्पादकांचा आहे.
काही चुकीच्या गुंतवणुकीने अर्बंन बँक अडचणीत आली. अनेक संकटांवर मात करत शहरात सहकाराचा पताका अखंड फडकविणाऱ्या या बँकेची अवस्था बिकट बनल्याने त्याला वाचवण्यासाठी रवळनाथ संस्थेने पुढाकार घेतला. अनेक सहकारी संस्थांनीही ठेवींचा टेकू दिला. यामुळे बँकेचे व्यवहार सुरळीत झाले. आता कुठे तरी पूर्वपदावर येत असताना संस्थेवर यावेळी निवडणुकीचा भुर्दंड नको, म्हणून निडसोशी स्वामीजींपासून कर्मचारी, सुकाणू समितीने निवडणूक बिनविरोधचा नारा दिला. मात्र त्याकडे डोळेझाक करुन बँकेवर निवडणूक लादली गेली. लोकशाही प्रक्रियेत निवडणुका व्हाव्यात. पण, अडचणीतील संस्थांना निवडणुकीचा खर्च पेलणारा नाही याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे. या संस्थांच्या उर्जितावस्थेसाठी प्रत्येकानेच एक पाऊल मागे घ्यायला हवे. अन्यथा या संस्था इतिहासजमा व्हायला वेळ लागणार नाहीत.
--------------
बाजार समितीला वाचवा
सीमाभागातील मोठी असणाऱ्या गडहिंग्लज बाजार समितीची निवडणूकही होणार आहे. आवक घटल्याने दोन दशके अंदरबट्ट्यातील या समितीला वाचवण्यासाठी साडेतीन तालुक्यातील राजकिये नेते एकत्र येवून गत निवडणूक तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध केली. आता आगामी निवडणूकही बिनविरोध करून आर्थिक भुर्दंडातून या संस्थेची सुटका होणार का, याचीच शेतकरी, कर्मचारी आणि व्यापाऱ्यांना चिंता आहे. गोडसाखर, अर्बन बँकेतील पडसाद आगामी समितीच्या निवडणूकीत उमटू नये, इतकीच सामान्यांची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.