आजऱ्यात अंधांसाठी
स्वयंसिद्धता कार्यशाळा
२९ व ३० जानेवारीला आयोजन; नेत्र तपासणीही होणार
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २२ : मरणोत्तर नेत्रदान चळवळीतर्फे आजरा तालुक्यातील अंधांसाठी मोफत स्वयंसिद्धता कार्यशाळा होणार आहे. २९ व ३० जानेवारीला सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत येथील जे. पी. नाईक व विद्यावर्धिनी पतसंस्थेच्या चैतन्य सांस्कृतिक सभागृहात ही कार्यशाळा होईल. अंधांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते स्वागत थोरात (मुंबई) व स्वरुपा देशपांडे (पुणे) मार्गदर्शन करणार आहेत. पंचायत समिती आरोग्य विभागाच्या सहकार्याने होत असलेल्या या कार्यशाळेत अंधांची नेत्र तपासणीही केली जाणार आहे.
अंधांनी पांढरी काठी कशी वापरावी, पायऱ्यांची रचना समजून घेऊन पायऱ्या कशा चढायच्या-उतरायच्या, प्रत्यक्ष रस्त्यावर पांढरी काठी घेऊन सुरक्षितपणे कसे चालायचे, भाज्या-फळे कशा ओळखाव्यात, वेगवेगळी धान्ये, कडधान्ये, खाद्यपदार्थ कसे ओळखावेत, आवाजावरून पक्षी, प्राण्याची ओळख पटविणे, दिशा कशा ओळखाव्यात, स्नायूंची लवचिकता वाढविण्यासाठी व्यायाम प्रकार, इतर ज्ञानेंद्रियांचा सक्षमपणे वापर कसा करावा यांसह दैनंदिन जीवनात वावरताना येणाऱ्या विविध अडचणींवर मात कशी करावी याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे.
तसेच स्वयंसिद्धता कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी गडहिंग्लज येथील अंकूर सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटलतर्फे अंधांची नेत्र तपासणी केली जाईल. नेत्रप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे शक्य असणाऱ्या अंधांवर पुढील उपचार केले जाणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होणारे अंध व त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच अंधांना पांढऱ्या काठीचे मोफत वितरण केले जाणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी अंधांच्या नातेवाईकांनी रमेश देसाई व सागर पाटील यांच्याशी साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.