कोल्हापूर ः भाजी विक्रेत्यांनी आणि नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगसह अन्य शासनाचे नियम पाळले नाहीत तर नाईलाजाने शहरातील भाजी विक्री बंद कारावी लागेल, असा इशारा महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी भाजी मार्केट नियोजन बैठकीत दिला. तसेच भाजी मार्केटमधील गर्दी टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ कराव्यात, असे आदेश महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी प्रशासनाला दिले.
शहरातील भाजीविक्रेत्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून भाजी विक्री करत नसल्याचे शहरात दिसून येत आहे. त्याचबरोबर नागरिकही भाजी घेण्यास गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. यावर उपाययोजना करण्यासाठी आज महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त व पदाधिकारी यांची बैठक झाली. यात पदाधिकाऱ्यांनी शहरात भाजी विक्रेते व फळ विक्रेते गर्दी करत आहेत. ते भाजी व फळे विक्री करताना सोशल डिस्टनसिंग पाळत नाहीत. मात्र आता कोरोना झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता भाजी व फळ विक्रेत्यांनी शहरात फिरती करून भाजी व फळे विक्री करावी, अशी मागणी केली.
भागात फिरती केल्यामुळे नागरिक भाजी व फळ खरेदी करण्यासाठी शहरात गर्दी करणार नाहीत. अन्यथा भाजी विक्रीसाठी आढवडयातून दोन दिवस द्यावेत अशीही मागणी केली.
उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे, प्रभाग समिती सभापती सौ.हसीना फरास, सौ.रिना कांबळे, गटनेता शारंगधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, रमेश मस्कर, रावसाहेब चव्हाण, बाबूराव दबडे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, आश्पाक आजरेकर, महेश उत्तुरे आदी उपस्थित होते.
मास्क नसल्यास जबर दंड
शहरातील जे नागरिकांनी मास्कचा वापर करणार नाहीत. त्यांना शंभर रुपयांचा दंड, भाजीविक्रेत्यांनी मास्क व हॅण्डग्लोज वापरले नाहीत तर दोनशे रुपये दंड आणि दुकानदारांनी मास्क व हॅण्डग्लोज वापरले नाही तर पाचशे रुपयांचा दंड करण्यात येणार असून याची कडक अंमलबजावणीसाठी वेळप्रसंगी दुकांदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करू असा इशारा आयुक्त डॉ कलशेट्टी यांनी दिला.
धान्य, मिरची बाजार सम विषम तारखेला
धान्य खरेदी, भाजी खरेदीच्या नावाखाली लक्ष्मीपूरीत होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने पुन्हा नियोजन बदलले असून धान्य बाजार आणि मिरची बाजार सम आणि विषम तारखेला एक दिवस आड सुरु करण्याचा निर्णय झाला. तर भाजी मंडई लक्ष्मीपूरी पोलिस ते फोर्ड कॉर्नर येथेच बसविण्यात येणार आहे. लक्ष्मीपूरीतील मंडई पुर्णपणे बंद केली जाणार आहे.त्याचबरोबर फळविक्रेत्यांनी कोंडाओळीला बसावे,असा निर्णय आज लक्ष्मीपूरी पोलिस ठाण्यात झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. पोलिस निरीक्षक अनिल गुजर,शहर अभियंना नेत्रदीप सरनोबत यांच्यासह महापालिकेचे विविध प्रतिनिधी उपस्थित होते.
ऋणमुक्तेश्वर भाजी मंडईच्या ठिकाणी वारंवार वादावाद होत आहे.त्यामुळे येथेही शिस्त लावण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. उद्या पहाटेपासून अतिक्रमण निर्मुलन पथक येथे कारवाई करणार आहे. सोशल डिस्टन्सचे पुरेपूर पालन याठिकाणी झाले पाहिजे. दरम्यान, फळ व्रिकीसाठी कोंडोओळीची जागा निश्चित केली आहे. एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी विभागून जागा देण्याचा निर्णय झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.