गडहिंग्लज : येथील उपजिल्हा रुग्णालय किंवा हरळी खुर्द येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीत विषाणूजन्य आजार तपासणीची प्रयोगशाळा उभारणीची कार्यवाही येत्या एक-दोन महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून या जागांची पाहणी करण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या निधीतून ही प्रयोगशाळा साकारणार असल्याचे सांगण्यात येते. कोरोनासह इतर विषाणूजन्य आजार तपासणीचे अहवाल यामुळे तातडीने मिळण्यास मदत होणार आहे.
विषाणूजन्य आजार आणि विशेषत: संसर्गाने होणाऱ्या आजारांची तपासणी करण्यासाठी सध्या कोल्हापूर, पुणे यांसारख्या शहरातील प्रयोगशाळांकडे धाव घ्यावी लागते. यामध्ये वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. रुग्णांच्या प्रथम संपर्कातील लोकांची संख्याही वाढत आहे. कोरोना विषाणूची चाचणी पूर्वी पुण्यात होत होती. आता ही सुविधा कोल्हापुरात सुरू झाली आहे. उशिरा येणारे अहवाल आणि त्यातून वाढणारा संसर्ग लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात ट्रू नॅट मशिनही उपलब्ध करण्यात आले आहे. याचा फायदा परिसरातील स्वॅब चाचणीसाठी होत आहे. अहवालासाठी मात्र कोल्हापुरातून प्रतीक्षा करावी लागत आहे. दोन ते तीन दिवसांनंतर अहवाल येण्याने अडचणी निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर आता आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड या उपविभागातील प्रमुख केंद्र असलेल्या गडहिंग्लज तालुक्यात ही प्रयोगशाळा उभारण्याचा मानस प्रशासनाचा आहे. त्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि हरळी खुर्द येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी करण्यात आली. त्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. रवींद्र शिवदास यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांचा दौरा झाला. येत्या एक-दोन महिन्यात प्रयोगशाळा उभारणीची कार्यवाही केली जाऊ शकते. जागा आणि स्थानिक गरज या सर्व अनुषंगाने अहवाल तयार करून पाठविण्यात येणार आहे. त्याला मंजुरी मिळताच राष्ट्रीय आरोग्य अभियानातून निधी प्राप्त होईल. दरम्यान, कोरोनासह अन्य आजारांच्या तपासणी अहवालासाठी करावी लागणारी प्रतीक्षा प्रयोगशाळा उभारणीने दूर होणार आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचा विचार...
उपजिल्हा रुग्णालय व हरळी खुर्द आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी केली आहे. हरळी खुर्द येथे फारशी गुंतवणूक करावी लागणार नसल्याने ही जागा चर्चेत पुढे असली तरी तेथील प्रयोगशाळेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे कठीण जाणार आहे. तालुक्यापासूनही हे ठिकाण लांब आहे. दुसरीकडे, उपजिल्हा रुग्णालयातील धर्मशाळेची इमारत सोयीची आहे. काहीशी डागडुजी करून येथे प्रयोगशाळा साकारता येऊ शकते. याशिवाय शहरात दळणवळण व इतर सुविधाही तातडीने उपलब्ध होऊ शकतात. तसेच हे ठिकाण उपविभागाच्या परिचयाचेही आहे. नियंत्रण ठेवणेही सोयीचे होणार आहे. यामुळे या जागेचा प्राधान्याने विचार होण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे कळते.
संपादन - सचिन चराटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.