गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत गडहिंग्लज तालुक्यात बाधितांचे प्रमाण आजरा व चंदगड तालुक्यापेक्षा कमी आहे. तरी मृत्यू दर या दोन्ही तालुक्यांच्या तुलनेत अधिक आहे. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यात 1200 कोरोना रूग्ण असून, त्यातील 961 जण बरे होवून घरी गेले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर पोहचले आहे.
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात हा भाग सुरक्षित होता. जुलैपासून गडहिंग्लज, आजरा व चंदगडमधील रूग्णसंख्येचा आलेख उंचावतच गेला. ऑगस्टमध्ये स्थानिक संसर्ग खूप वाढत आहे. बाहेरून आलेल्या चाकरमान्यांमध्ये बाधित आढळण्याचे प्रमाण कमी झाले असून, आता स्थानिक संसर्ग 60 टक्क्यापर्यंत पोहचल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे लोकांनी अधिक खबरदारी बाळगून सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे स्वत:ला बंधनकारक करणे गरजेचे बनले आहे.
गडहिंग्लज तालुक्यात 4804 स्वॅब तर 898 अँटीजेन तपासणी केली आहे. यात 424 रूग्णांचा आढळ झाला असून आतापर्यंत 329 जण बरे होवून घरी गेले आहेत. दुर्दैवाने 15 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्याचा मृत्यू दर हा 3.53 टक्के इतका झाला, असून बरे होण्याचे प्रमाण 77.59 टक्क्यांवर आहे. चंदगड तालुक्यातून 4575 स्वॅब तर 412 अँटीजेन टेस्ट झाल्या आहेत. 480 बाधितांची संख्या असून, 405 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तीचे रप्रमाण 84.37 टक्के इतके आहे. दहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, त्याचे प्रमाण 2.08 टक्के आहे. आजऱ्यात 2261 स्वॅब तपासणी आणि 604 अँटीजेन टेस्ट घेतल्या आहेत. 296 एकूण रूग्णांची नोंद असून, 227 रूग्ण बरे झाले आहेत. त्याचे प्रमाण 81.7 टक्के इतके आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाने सहा जणांचा बळी गेला असून, 2.2 टक्के मृत्यूदर आहे. तीन्ही तालुक्यातील ऑक्सिजनची गरज असलेल्या काही रूग्णांवर सीपीआर, उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. लक्षणे नसलेल्या सर्व रूग्णांवर कोविड केअर सेंटरमध्येच उपचार सुरू असून, गडहिंग्लजमधील 15, चंदगडचे सहा आणि आजऱ्यातील 7 जणांवर गृह अलगीकरणात उपचार सुरू आहेत.
लक्षणे नसलेले लवकर बरे
विशेषत: कोणतीच लक्षणे नसलेल्या परंतु बाधित असलेल्या रूग्णांवर ज्या-त्या तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. गरम पाणी, पोषक आहार, प्रतिकार शक्ती वाढवणारी तसेच ताप, सर्दी, खोकल्याची औषधे देवून रूग्णांना कोरोनामुक्त केले जात आहे. इतर आजार असलेल्या रूग्णांना ज्या-त्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून उपचार केले जात आहेत. दरम्यान, कोविड केंद्रात फिजीशियन डॉक्टर नसल्याने अत्यवस्थ रूग्णांवर उपचार करण्यात अडथळे येत आहेत. परिणामी मृत्यू दरातील वाढही चिंताजनक आहे.
गडहिंग्लज उपविभागात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण इतर ठिकाणापेक्षा अधिक आहे. आरोग्य यंत्रणेला याचे यश जाते. संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासनाने "हॉटस्पॉट'वर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या भागात अधिकाधिक लोकांचे स्क्रिनिंग करण्यासह विविध उपाययोजना सुरू आहेत. लोकांनी लक्षणे दिसताच तपासणीसाठी पुढे आल्यास संसर्ग टाळता येतो आणि लवकर कोरोनामुक्त होता येते.
- विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज
संपादन : सुजित पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.