कोल्हापूर - शहरातल्या तालमींतील मल्लांत महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविण्याचे ‘टार्गेट’ निश्चित झालेले असायला हवे, असा जाणकारांचा सूर आहे. महाराष्ट्र केसरी अधिवेशनात कोल्हापूर जिल्ह्यातील कोणता मल्ल गदा मिळविणार याची जशी चर्चा होते, त्याचप्रमाणे मल्लांना नोकरीसाठी पुढाकार कोण घेणार? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. त्यामुळेच गावोगावच्या मैदानांशिवाय त्यांना पर्याय राहत नसल्याचे चित्र आहे. त्यातूनच त्यांचा कुस्तीतील प्रवास गावोगावच्या मैदानापुरताच राहत असल्याचे दिसत आहे.
दोन-तीन दशकांपूर्वी महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी स्पर्धेसाठी उतरणाऱ्या मल्लांकडे वस्तादांचे बारीक लक्ष असायचे. त्यांना गावोगावच्या मैदानांत लढतीसाठी परवानगी नाकारली जायची. वस्तादांच्या चौकटीतच मल्लांचा सराव सुरू राहायचा. मल्लांचे टार्गेट वस्तादांकडून फिक्स झाल्याने त्याच्या सरावात कसूर केली जायची नाही. खुराकासाठी मल्लांना गावोगावच्या मैदानांतून मिळणाऱ्या मानधनावर विसंबून राहण्याची वेळ यायची नाही. अलीकडे चित्र खूपच बदलले आहे.
आर्थिक सक्षमतेसाठी मल्लांना नोकऱ्यांची आवश्यकता असल्याने ते परजिल्ह्यांतून, परराज्यांतून खेळण्यास प्राधान्य देत आहेत. शहरातल्या तालमींमध्ये परजिल्ह्यांतील मल्लांचा आकडा अधिक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मल्लांची संख्या अत्यंत कमी आहे. उदयोन्मुख मल्ल रेल्वेतील नोकरीसाठी पुण्यातील आखाड्यात दाखल होऊ लागले. महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी दावेदारांच्या यादीत कोल्हापुरातील मल्ल दिसत नाहीत. याउलट उत्तरेतल्या मल्लांत निश्चित ध्येय असल्याचे दिसते, असे जाणकार सांगतात. आंतरराष्ट्रीय पदक मिळविल्यावर त्यांना नोकरीची खात्री मिळते. तशी कोल्हापूर जिल्ह्यातल्या किंबहुना राज्यातल्या मल्लांना मिळत नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या उद्योजकांनी मल्लांना नोकरी देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे. राजर्षी शाहू साखर कारखाना ज्या पद्धतीने मल्लांना दत्तक घेतो, त्याप्रमाणे अन्य कारखान्यांनी मल्ल दत्तक घेऊन त्यांचा आकडा वाढवावा लागेल.
म्हाळुंगे बालेवाडीत होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये शाहू विजयी गंगावेश तालमीच्या कोणत्याही मल्लाने जर ‘महाराष्ट्र केसरी’ किताब मिळवला तर त्याची हत्तीवरून मिरवणुक काढण्याचा अभिनव संकल्प तालमीचे माजी मल्ल व महाराष्ट्र पोलिस दलाचे संग्राम कांबळे यांनी केला आहे. शाहू विजयी गंगावेश तालमीने कित्येक महाराष्ट्र केसरीच्या गदा इतिहासात मिळवल्या. पहिले डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर हे गंगावेश तालमीचेच मल्ल. त्यानंतरही कित्येकांनी गंगावेशला गदा मिळवून दिल्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गंगावेश तालमीचा मैदानी कुस्तीत क्रमांक एक असूनही महाराष्ट्र केसरीपर्यंत पोचत नाही. आजमितीला माऊली जमदाडे, सिकंदर शेख सारखे राष्ट्रीय मल्ल येथे सराव करतात. इतर अनेक जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करतात. यापैकी कोणीही जर महाराष्ट्र केसरी किताब जिंकला तर कोल्हापूरच्या आजवरच्या परंपरेप्रमाणे त्यांची विजयी मिरवणूक कोल्हापूरमधून काढली जाईल, असा संकल्प संग्राम यांनी एका व्हिडिओद्वारे केला आहे.
वस्तादांच्या नजरेतून आमची सुटका नसायची. आम्हाला बाहेरील मैदाने करायची परवानगी नव्हती. तसे स्टॅम्पपेपरवर लिहून द्यावे लागे. टार्गेट ठेवूनच आमचा प्रवास सुरु असायचा. कोल्हापूर जिल्ह्यातल्या मल्लांच्या नोकरीची सोय झाली तर त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळेल. त्यांचे खेळाकडे लक्ष केंद्रित होईल. गावोगावची मैदाने करण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होतील
- हिंदकेसरी दीनानाथ सिंह
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.