इस्लामपूर (जि. सांगली) : शासनाकडून मंजुरी मिळालेल्या आणि पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या निधीच्या वाटपावरून पालिकेची सभा आज गाजली. चार प्रभाग वगळून इतर प्रभागांमध्ये निधीचे समान वाटप करण्यावरून झालेल्या मतदानात राष्ट्रवादीची सरशी झाली. निधीचे समान वाटप करण्याचा निर्णय झाला. भाजी मंडई आणि वाहनतळाचा विषय तहकूब करण्यात आला.
नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या उपस्थितीत सभा झाली. जिल्हा वार्षिक योजनेच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजने अंतर्गत अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यावरून बराच वेळ गोंधळ झाला. नगराध्यक्षांच्या अधिकारातील रक्कम वजा जाता उर्वरित 2 कोटी 13 लाख रुपयांचे समान वाटप करण्यासाठी राष्ट्रवादीने मतदान घेण्याचा आग्रह धरला. विश्वनाथ डांगे यांनी हरकत घेतली. ती फेटाळली. प्रभाग 1, 3, 5 व 14 वगळून इतर 10 प्रभागांत समान वाटप करण्यावर मतदान घेण्यात आले.
विकास आघाडी 11 विरुद्ध राष्ट्रवादी 13 मतांनी ठराव मंजूर करण्यात आला. 88 लाख रक्कम वजा जाता उर्वरित निधी 10 प्रभागांना देण्याचा निर्णय झाला. नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजने अंतर्गत 50 लाख निधीचे 10 प्रभागात समान वाटप होण्याबाबत सर्वानुमते ठराव मंजूर झाला.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामाच्या निधी मागणीच्या प्रस्तावावर सव्वा चार कोटी रुपये निधी प्रभाग 3, 5 व 14 मध्ये समान वाटप करण्याचे ठरले. शहरात ज्या ज्या ठिकाणी दलित वस्ती असेल त्या ठिकाणी हा निधी खर्च करावा, अशी सूचना खंडेराव जाधव यांनी केली. भाजी मंडई बांधकाम व वाहनतळासाठी 14 व्या वित्त आयोगातून तरतुदींच्या विषयावरही दीर्घ चर्चा झाली. खर्च जवळपास 30 कोटी आहे. सहा कोटी रुपये उपलब्ध आहेत. कामाचे नियोजन योग्य व्हावे, मध्येच थांबू नये, अशी अपेक्षा आनंदराव पवार यांनी व्यक्त केली.
भाजी मंडई बांधकाम रचना सभागृहासमोर न आणता मंजूर केल्याबद्दल खंडेराव जाधव यांनी आक्षेप घेतला. 14 व्या वित्त आयोगाचा निधी तिकडे न वळवण्याची सूचना केली. विजेच्या तारा, ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगसाठी निधी वापरण्याची सूचना शहाजी पाटील यांनी केली. यावर दीर्घ चर्चेअंती हा विषय तहकूब करण्यात आला. या विषयासाठी स्वतंत्र सभेचे आयोजन करण्याचा निर्णय झाला. दादासो पाटील, शहाजी पाटील, अमित ओसवाल, आनंदराव मलगुंडे, वैभव पवार, प्रदीप लोहार, शकील सय्यद यांनी चर्चेत भाग घेतला.
राष्ट्रवादीवर नगराध्यक्ष नाराज
प्रत्येकी विषयावर निधी मिळवून आणू या राष्ट्रवादीच्या भूमिकेवर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. शहराच्या विकासाला राष्ट्रवादी जाणीवपूर्वक विरोध करत असल्याची टीका त्यांनी केली.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.